आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले
आधार कार्डच्या नवीन फॉरमॅटमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव काढून टाकल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सारथी पोर्टलवर अर्ज भरताना वडिलांचे नाव आवश्यक असते, पण आधार ई-केवायसीमधून ही माहिती मिळत नसल्याने हजारो अर्ज अर्ध्यावरच अडकले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
परिवहन विभागाच्या नियमानुसार ऑनलाइन लायसन्स अर्ज करताना वडिलांचे नाव भरणे बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक आधार ई-केवायसी माध्यमातून अर्ज भरतात. मात्र, नवीन आधार कार्डामध्ये वडिलांचे नाव स्वतंत्रपणे उपलब्ध नसल्याने ‘सारथी’ पोर्टलवर माहिती फेच करताना संबंधित रकाना रिकामा राहतो. आधारमधील माहिती लॉक असल्यामुळे नागरिकांना स्वतःहून वडिलांचे नाव टाकण्याची परवानगी मिळत नाही. परिणामी, अर्ज सबमिट होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे नागरिकांना वारंवार आरटीओ कार्यालयांचे फेरे मारावे लागत असल्यचे पाहायला मिळत आहे. विशेषतः तरुण आणि ग्रामीण भागातील अर्जदारांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिजिटल इंडियाच्या काळात सर्व प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी, या अडथळ्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
या समस्येकडे ‘महाराष्ट्र व्हिएलई संवाद’ संघटनेने लक्ष वेधले आहे, संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे परिवहनमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. ‘सारथी’ पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करून वडिलांचे नाव मॅन्युअली भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी शंकर होला यांनी केली आहे. यासोबतच राष्ट्रीय माहिती केंद्राने सारथी सॉफ्टवेअरमध्ये तातडीने आवश्यक बदल करावेत, आधारमध्ये वडिलांचे नाव उपलब्ध नसल्यास पर्यायी आधार कागदपत्रावरील माहिती स्वीकारावी तसेच तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत नागरिकांची अडवणूक थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी परिवहन विभाग आणि केंद्र सरकार कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






