फोटो सौजन्य - Social Media
तुमच्या शहरात जर चाय सुट्टा बार असं ठिकाण असेल, तर तुम्हीही तिथे एकदा का होईना, मित्रांसोबत चहा पिऊन गप्पा मारल्या असतील. परंतु 2016 पूर्वी कुणालाही वाटलं नव्हतं की चहा विक्रीसारखा व्यवसायही एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरू शकतो. आज अनेकांना वाटतं की यश मिळवायचं असेल तर मोठ्या स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण संस्था पार कराव्या लागतात. मात्र अनुभव दुबे यांची कहाणी या सर्व विचारांना छेद देणारी आहे.
अनुभव दुबे यांचा जन्म मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात 1996 साली झाला. व्यावसायिक पार्श्वभूमीत वाढलेले अनुभव, वडिलांच्या इच्छेनुसार UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेले. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी आपली खरी आवड व्यवसायात असल्याचे ओळखले. 2016 मध्ये, मित्र आनंद नायकसोबत मिळून त्यांनी इंदोरमध्ये एका हॉस्टेलच्या समोर आपल्या चहा व्यवसायाची सुरुवात केली. फक्त 3 लाख रुपये गुंतवणुकीतून ‘चाय सुट्टा बार’चा पहिला आउटलेट सुरू झाला.
त्यांच्या व्यवसायाचे यश हे त्यांच्या हटके संकल्पनेवर आधारित होते – पारंपरिक कुल्हड चहा आणि बारची थीम यांचे यशस्वी मिश्रण. या ठिकाणी धूम्रपान पूर्णपणे बंद होते, ज्यामुळे आरोग्याबद्दल सजगतेचा संदेश दिला गेला. आर्थिक मर्यादा असूनही त्यांनी मित्रांकडून वस्तू गोळा करून आणि सेकंड हँड फर्निचर वापरून दुकान साकारले. साध्या लाकडी पाटीवर हाताने “चाय सुट्टा बार” असे लिहून नाव ठेवले गेले, जे तरुण पिढीच्या मनात लगेच घर करून गेले.
सुरुवातीला त्यांना आर्थिक अडचणी आणि तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागला. पण त्यांनी हट्टाने 20 प्रकारच्या फ्लेवर्समध्ये चहा उपलब्ध करून दिला आणि ग्राहकांना एक वेगळी अनुभूती दिली. कोणताही मोठा जाहिरात खर्च न करता, लोकांच्या तोंडी प्रचारातूनच ब्रँडची लोकप्रियता वाढली. पर्यावरणपूरक कुल्हड आणि स्मोक फ्री वातावरण हे त्यांच्या यशाचे महत्त्वाचे घटक ठरले. छोट्या स्टॉलपासून सुरुवात करून चाय सुट्टा बारने आता भारतातील 195 हून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली आहे. सध्या त्यांच्या 165+ आऊटलेट्स आहेत आणि दुबई, ओमान यांसारख्या देशांतही त्यांनी आपले बस्तान बसवले आहे. अनुभव दुबे यांची ही कहाणी सिद्ध करते की जर तुमच्याकडे इच्छाशक्ती, मेहनत आणि कल्पकता असेल, तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही.