स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिटबाबत उदय कोटक यांचा इशारा; म्हणाले... या कंपन्या बनू शकतात राजकीय मुद्दा?
सध्याच्या घडीला क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने 10 ते 15 मिनिटांत जवळपास प्रत्येक हवी ती जीवनावश्यक वस्तू घरी पोहोचवणाऱ्या या कंपन्यांबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. अशातच कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी या झटपट कॉमर्स कंपन्यांमुळे किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळानुसार, उदय कोटक यांनी एका कार्यक्रमात हा राजकीय मुद्दा बनू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोटक यांनी इतर अनेक देशांपेक्षा भारतातील द्रुत व्यापाराच्या यशाबद्दल देखील सांगितले आहे.
हे देखील वाचा – एलॉन मस्क एका मिनिटाला कमावतात इतके कोटी रुपये; आकडा… वाचून चाट पडाल…!
काय म्हणाले उदय कोटक?
उदय कोटक एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले आहे की, स्थानिक किरकोळ विक्रेत्यांसाठी क्यू-कॉम (क्विक कॉमर्स) हे आव्हान आहे. हे आव्हान राजकीय पटलावर येणार आहे. किराणा आणि खाद्यपदार्थ डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या लिस्टनंतर त्यांनी हे सांगितले. स्विगीचा आयपीओ 13 नोव्हेंबर रोजी 17 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाला आहे.
क्विक कॉमर्स म्हणजे काय?
क्विक कॉमर्स म्हणजे 10-30 मिनिटांत ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये अन्न, पेय आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवणे. Blinkit, Zepto, Swiggy Instamart आणि Flipkart Mins हे भारतातील आघाडीचे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक आहेत. डेटाम इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, 2024 मध्ये 6.1 अब्ज डॉलरच्या तुलनेत 2030 पर्यंत क्विक कॉमर्स मार्केटचा आकार 40 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
क्विक कॉमर्सच्या यशाबद्दल काय म्हटलंय त्यांनी?
उदय कोटक यांनीही भारतातील क्विक कॉमर्सच्या यशाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भारत हा जगातील एक अद्वितीय देश आहे. जिथे जलद सेवा रिटेल यशस्वी झाली आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे हे मॉडेल तितकेसे प्रभावी ठरले नाही.
ॲपल, मेटासारखे ब्रँड तयार करण्यावर भर
उदय कोटक यांनी भारतातील नवनिर्मितीचा सकारात्मक परिणाम मान्य केला आहे. ॲपल, मेटा आणि युनिलिव्हर यांसारखे मजबूत ग्राहक ब्रँड विकसित करण्यासाठी भारतीय व्यवसायांनी भर दिला आहे.