बेरोजगारी घटली, शहरांमध्ये वाढला रोजगार; वाचा... काय सांगतोय एनएसएसओचा नवीन अहवाल!
देशातील बेरोजगारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसएसओ) आपली ताजी आकडेवारी जारी करत, देशातील बेरोजगारीत घट झाल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर 6.6 टक्क्यांवर आला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 6.7 टक्के इतका नोंदवला गेला होता.
पुरुषांच्या बेरोजगारीत मोठी घट
दरम्यान, एनएसएसओच्या या नवीन अहवालानुसार, देशात पुरुषांच्या बेरोजगारीत मोठी घट झाली आहे. याउलट पहिल्या तिमाहित महिलांमधील बेरोजगारीत तब्बल ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापुर्वी हा आकडा 8.5 टक्के इतका होता. त्यामुळे आता ही सरकारसाठी चिंतेची बाब असणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या तिमाहीत तरुणांचा (15-29 वर्षे) बेरोजगारीचा दरही 16.8 टक्क्यांवर घसरल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या तिमाहीत जो तब्बल 17 टक्के होता. त्यामुळे ही देखील सरकारसाठी समाधानकारक बाब असणार आहे.
देशातील रोजगार क्षेञ मजबूत
एनएसएसओच्या या नवीन अहवालानुसार, देशातील रोजगार क्षेञ मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात तरुण पुरुषांच्या बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले असून, तरुणींमध्ये हा आकडा अधिक वाढला आहे. तर नोकऱ्या शोधणाऱ्या लोकांची स्थितीची माहिती देणारा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 50.1 टक्के नोंदवल गेला आहे. जो मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत 50.2 टक्के इतका नोंदवला गेला होता.
स्वयंरोजगारात काहीशी घट
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसएसओ) सर्व्हेक्षणात असेही आढळून आले आहे की, देशातील स्वयंरोजगारात गुंतलेल्या लोकांचा वाटा, गेल्या तिमाहीत 40.5 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर घसरला आहे. मागील तिमाहीत पगारदार कामगार आणि अनौपचारिक कामगारांचा वाटा अनुक्रमे 49 टक्के आणि 11 टक्के वाढला आहे. या कालावधीत नियमित कामात महिला कामगारांचा सहभाग 52.3 टक्क्यांवरून 54 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्रातील कामगारांचा वाटाही ३२ टक्क्यांवरून ३२.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.