वाघ बकरीचे पारस देसाई यांची FAITTA च्या अध्यक्षपदी निवड (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक पारस देसाई यांची FAITTA (फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन) या राष्ट्रीय शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही संघटना भारतभरातील चहा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. चहा खरेदीदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी ती शासन प्राधिकरणे, टी बोर्ड आणि संबंधित संस्थांशी उद्योगातील विविध आव्हानांवर काम करते. वाघ बकरी टी ग्रुपच्या संचालिका विदिशा देसाई यांचीही FAITTA च्या कार्यकारिणी समितीत निवड झाली आहे.
श्री. देसाई हे वाघ बकरी टी कुटुंबातील चौथ्या पिढीचे उद्योजक असून 1993 पासून ते या समूहाशी संलग्न आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वाघ बकरी भारतातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड टी व्यवसायांपैकी एक बनले असून 24 राज्यांत आपले जाळे पसरवले आहे आणि 60 हून अधिक देशांमध्ये चह्याची निर्यात करते.
त्यांनी NABL मान्यता प्राप्त इन-हाऊस टेस्टिंग लॅब उभारण्यासह इंस्टंट टी प्रीमिक्सेस, वेलनेस ब्लेंड्स आणि वाघ बकरी टी लाउंजेस यांसारखे अनेक नवे उपक्रम सुरू केले आहेत. वाघ बकरीच्या कामकाजाचे आधुनिकीकरण, वितरण सुधारणा आणि मजबूत रिटेल नेटवर्क उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते वेस्टर्न इंडिया टी डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पदही भूषवत आहेत.
आपल्या निवडीबाबत श्री. देसाई म्हणाले, “FAITTA चे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. सर्व सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. तसेच माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या मोठ्या योगदानाबद्दल आभार मानतो. आज चहा उद्योग मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. बदलते ग्राहकांचे कल आणि हवामान बदल ही गंभीर आव्हाने आहेत. माझा भर उद्योगातील सदस्य, सरकार व नियामक यांच्यासोबत घनिष्ठ सहकार्य करून चहा उद्योग आणखी बळकट करण्यावर असेल. आगामी संधी आणि आव्हाने पेलण्यासाठी सर्व भागधारकांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”
श्री. देसाई यांना ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून मॅनेजमेंट स्टडीजचे डिप्लोमा आहे. तसेच ते 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कुशल टी टेस्टर आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि पुनर्वसन क्षेत्रातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे योगदान देतात.
2014 मध्ये स्थापन झालेल्या FAITTA मार्फत भारतभरातील चहा व्यापाऱ्यांच्या संघटना एकत्र येऊन लिलाव, घाऊक व किरकोळ व्यापार, पॅकेजिंग, वेअरहाऊसिंग आणि निर्यात यांसंबंधी प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. अन्न सुरक्षा मानकांचे, विशेषतः FSSAI च्या रेझिड्यू नियमांचे पालन सुनिश्चित करणे, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि वाढत्या खर्च, बदलते नियम व सैल चह्याऐवजी पॅकेज्ड चह्याकडे वळणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीमध्ये व्यापाऱ्यांचे हितसुरक्षण करणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे.