एकिकडे मस्क यांचा अमेरिकी निवडणुकीसाठी प्रचार, दुसरीकडे एक्स कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानी कायम आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्या कंपन्यांमधील टाळेबंदीबाबत नेहमीच माहिती समोर येत असते. एक्स या समाजमाध्यमावर नेहमीच यातील बरीच माहिती समोर येत असते. अलीकडेच, एलॉन मस्क यांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
टाळेबंदीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही
द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सच्या अंतर्गत स्त्रोतांचा आणि कार्यस्थळावरील प्लॅटफॉर्म ब्लाइंडवरील पोस्टचा हवाला देऊन असे सांगण्यात आले आहे की, एक्सच्या अभियांत्रिकी विभागातून कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. अहवालानुसार टाळेबंदीच्या दोन महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांना कंपनीतील त्यांच्या योगदानाचा एक पृष्ठाचा सारांश त्यांच्या नेत्यांना सादर करण्यास सांगितले होते.
द व्हर्जने अहवाल दिला आहे की, याचा अर्थ असा की त्यांचा स्टॉक प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीतील त्यांच्या योगदानाबद्दल एक पृष्ठाचा सारांश सादर करावा लागला. ज्या कर्मचाऱ्यांनी तसे केले किंवा न केले त्यांच्यावर आता कर्मचारी कपातीची टांगती तलवार आली आहे. या छाटणी प्रक्रियेत किती कर्मचारी बाधित झाले आहेत. याबाबत कोणतीही माहिती नाही.
एलॉन मस्क आणि एक्स यांनी अद्याप या टाळेबंदीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एलॉन मस्क अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत आहेत. मस्क यांनी अलीकडेच एक्स कर्मचाऱ्यांना त्याच्या स्टॉक ग्रँट्सबाबत एक ई-मेल पाठवला होता.
1000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश
या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये देखील, एक्सने आपल्या ‘सुरक्षा’ कर्मचाऱ्यांपैकी 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. तर मस्क यांनी 2022 मध्ये एक्स विकत घेतानाच कंपनीतील सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. अर्थात एकाच वेळी कंपनीतील 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या कर्मचारी कपातीमुळे विविधीकरण, समावेश, उत्पादन विकास आणि डिझाइन यासारख्या कंपनीच्या अनेक विभागांवर परिणाम झाला. कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन टीममधील कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले होते.