एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले (फोटो- सोशल मीडिया)
प्रताप सरनाईक यांची परळ बसस्थानकाला भेट
चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये आढळल्या मद्याच्या बाटल्या
एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे निर्देश
मुंबई: २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी चालक -वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या . तसेच काही कर्मचारी मद्यपान केल्याचे देखील आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारात कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे आता अधिक सक्तीचे करण्यात आले आहे.
तपासणी अधिक कडक
१)कर्तव्यावर जाणाऱ्या चालकांनी मद्यपान केले नसल्याची खात्री करूनच त्यांना ड्युटीवर पाठविण्यात यावे.
२)ज्या चालकाला विशिष्ट वाहनावर कर्तव्य देण्यात येणार आहे, त्या वाहनासोबतच त्याची अल्कोहोल तपासणी (ब्रिथ अॅनालायझर चाचणी) करण्यात यावी.
३)वाहन परीक्षकांनी चालकाची तपासणी न करता वाहन बाहेर जाऊ देऊ नये.
४)मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठेवून त्याची माहिती आगार व्यवस्थापकांना द्यावी.
आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी
आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच, मुख्यालयाकडून अचानक तपासण्या (सरप्राइज चेक) घेण्यात येणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासी सुरक्षेला प्राधान्य
एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब मानून महामंडळाने शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण अवलंबले असल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असून एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली जात आहे.






