1st Dupety CM Sunetra Pawar: पवार वारसा आणि राजकीय समीकरणे: सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीला मिळणार नवी दिशा
1st Dupety CM Sunetra Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने राजकारणात एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून राज्याला कधीही महिला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मिळाली नाही. महिला मुख्यमंत्रीपदासाठी अनेकदा खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह इतर काही महिलांच्या नावाची अनेकदा नावेही पुढे आली. पण महिला मुख्यमंत्रीपदाची केवळ चर्चाच होत राहिल्या. पण अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राला सुनेत्रा पवार यांच्या रुपाने पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे.
अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर, त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी होणारी निवड हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचे वळण आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
या निर्णयामुळे बदलणारी महत्त्वाची राजकीय समीकरणे खालीलप्रमाणे आहेत:
‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पक्षातील आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि संभाव्य फूट टाळण्यासाठी पवार हे नाव महत्त्वाचे मानले जाते. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने आमदारांना पुन्हा एक विश्वासार्ह चेहरा मिळाला आहे. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा पक्षाला मिळू शकतो.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे महायुतीमधील (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) समीकरणे नव्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध सुनेत्रा पवार कशा प्रकारे पुढे नेतात, यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्याकडे थेट प्रशासकीय अनुभव कमी असला तरी, त्यांना छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांची साथ लाभणार आहे.
अजित पवारांच्या अपघातापूर्वी आणि नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणाचे संकेत दिले होते. सुनेत्रा पवार यांची भूमिका या प्रक्रियेत निर्णायक ठरू शकते. राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबातील कौटुंबिक स्नेह या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक पार पडेल. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा सदस्य आहेत, मात्र उपमुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना ६ महिन्यांत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. त्या बारामतीमधून पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघींमध्ये लढत झाली होती. आता सुनेत्रा पवारांच्या नव्या जबाबदारीमुळे बारामतीतील वर्चस्वाची लढाई नव्या वळणावर पोहोचली आहे.
या सगळ्यात महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाली नव्हती. सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात महिलांच्या उच्च पदावरील सहभागाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.






