फोटो सौजन्य - Social Media
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात लवकरच ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन उपलब्ध होणार आहे. या मशीनच्या खरेदीसाठी २४.९७ कोटी रुपयांची नवीन प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेअंतर्गत हे मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती दिली. विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, या मशीनच्या खरेदीसाठी औषध महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मशीनच्या खरेदीस विलंब झाला. त्यानंतर हाफकिन महामंडळामार्फत होणारी खरेदी प्रक्रिया बंद करून औषधी व वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या नवीन यंत्रणेद्वारे आता मशीन खरेदी केली जाणार आहे.
‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, यामुळे रुग्णांच्या अचूक निदानास मदत होणार आहे. योग्य निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीचा अवलंब करून सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या सोयीसुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. केंद्र सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्याला ९०० नवीन जागा मंजूर केल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी अधिक विस्तारल्या जाणार आहेत. या नव्या जागांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अधिक सक्षम होतील आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची संधी मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भातही सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे महाविद्यालय कार्यान्वित झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवांचा अधिक चांगला लाभ मिळणार आहे. या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य हरिष पिंपळे, विजय वडेट्टीवार, डॉ. राहुल पाटील आणि अजय चौधरी यांनी सहभाग घेतला. राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये अधिक अद्ययावत करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन धोरणे, तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.