बैठकीत टीईटी परीक्षेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तयारी, गोपनीय परीक्षा साहित्याची सुरक्षित वाहतूक, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, भरारी पथकांची स्थापना, अखंडित वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
परीक्षा पारदर्शक, गैरप्रकारमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून टीईटी परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
परीक्षेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 सकाळी 10.30 ते 1 या वेळेत तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे.
यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी जिल्ह्यात पेपर क्रमांक १ (प्राथमिक) साठी १३,२३३ तर पेपर क्रमांक २ (उच्च प्राथमिक) साठी १६,१८१ उमेदवारांनी नोंदणी केली असून एकूण २९,४१४ उमेदवार परीक्षा देणार आहेत. माध्यमनिहाय उमेदवारांमध्ये हिंदी माध्यमाचे ९,२३५ मराठी माध्यमाचे ८,७९१, उर्दू माध्यमाचे १,७५५ आणि इंग्रजी माध्यमाचे ८६८ उमेदवारांचा समावेश आहे.






