फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने टेक्निकल कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PhD मिळवण्याचा मार्ग अधिक कठीण केला आहे. रिसर्च प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी AICTE ने काही नवीन नियम लागू करण्याची तयारी केली आहे. यासाठी खास टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या फोर्सचे अध्यक्षपद बेंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू के.आर. वेणुगोपाल यांनी भूषवले. या फोर्सने जुलै 2025 मध्ये आपला अहवाल AICTE कडे सादर केला असून सध्या तो शिक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे.
नवीन नियमानुसार, संशोधकांना त्यांच्या थीसिसवर आधारित किमान एक संशोधन लेख (Article) पब्लिश करणे अनिवार्य असेल. हा लेख अशा जर्नलमध्ये छापला गेला पाहिजे ज्याला संशोधकांचे सहकारी, वरिष्ठ किंवा इतर विद्यार्थी मान्यता देतील. तसेच संशोधकांना आपले लेख विविध कॉन्फरन्समध्ये सादर करावे लागतील. विशेष म्हणजे, जे विद्यार्थी स्कोपस-इंडेक्स Q1 जर्नलमध्ये आपला आर्टिकल पब्लिश करतील त्यांना 2.5 वर्षांतच थीसिस सबमिट करण्याची मुभा मिळेल. आत्तापर्यंत UGC ने अशा प्रकारचे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत.
थीसिसच्या डिस्क्लेमरमध्ये संशोधकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर किती प्रमाणात व कुठे केला आहे हे स्पष्ट करावे लागेल. यासोबतच कॉपीराइट स्टेटमेंट्स, रेफरन्सेस आणि प्लॅजिअरिझमची (साहित्यिक चोरी) माहिती देखील समाविष्ट करावी लागेल. AICTE चा स्पष्ट नियम आहे की थीसिसमधील जास्तीत जास्त 20% मजकूरच AI च्या साहाय्याने लिहिला गेला पाहिजे.
नवीन फ्रेमवर्कनुसार, उच्च कामगिरी करणारे विद्यार्थी 2.5 वर्षांतच आपली PhD पूर्ण करू शकतात. याशिवाय देशातील एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात विद्यार्थी सहजतेने स्थलांतर करू शकतील. महत्वाचे म्हणजे, निवृत्त प्राध्यापकांनाही संशोधकांना मार्गदर्शन किंवा सह-मार्गदर्शन करण्याची परवानगी दिली जाईल. या सर्व बदलांमुळे टेक्निकल एज्युकेशनमधील संशोधन अधिक काटेकोर व दर्जेदार होण्याची अपेक्षा AICTE ने व्यक्त केली आहे.