Sindhudurg Zilla Parishad: राजकीय अस्तित्वाची लढाई! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभव नाईक विरुद्ध महायुती थेट सामना (फोटो-सोशल मिडिया)
Sindhudurg Zilla Parishad: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध गावांतील शिवसेना बुथना भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. या दौऱ्या दरम्यान त्यांच्यासमवेत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुडाळ तालुक्यात एकाही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची जागा बिनविरोध झालेली नाही. सर्व जागांवर उबाठा शिवसेनेकडून महायुतीला जोरदार टक्कर दिली जात आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची निर्णायक लढाई मानली जात आहे.
Zilla Parishad Election 2026 : चिपळुणात ईव्हीएम मशिनच्या बिघाडाची मालिका; मतदार नाराज
महायुती व विद्यमान आमदार निलेश राणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी नाईक यांनी प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक लढा उभारल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच मतदार संघात दिलेले उमेदवार त्यानंतर ठेवलेला बुथनिहाय संपर्क, कार्यकत्यांचा उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळे कुडाळ मालवण परिसरातील ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील एकूण ५५ हजार ३४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये २६ हजार २७१ महिला मतदार तर २९ हजार ७३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. सायंकाळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असून मतदारांमध्ये लोकशाही उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण १५३ बूथवर मतदान प्रक्रिया राबवली जात असून, सकाळच्या सत्रात मतदानाची गती काहीशी संथ पाहायला मिळाली.
फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी
शेतीची कामे आणि सकाळची घरगुती कामे यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील सर्व १५३ मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. सध्या मतदान केंद्रांवर गर्दी कमी असली, तरी दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळी मतदानाचा वेग वाढण्याची आशा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.






