हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला (फोटो - AI)
Himanta Biswa Sarma Press Conference : आसाम : यंदाच्या वर्षी आसाममध्ये (Assam News) विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आसामामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टीका सुरु आहेत. रविवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मात्र त्यांनी काँग्रेसच्या (Congress Politics) खासदारांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे पाकिस्तानसोबत खास संबंध असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी गोगोई यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगितले. सरमा म्हणाले की, आसाममध्ये गुंतवणुकीच्या प्रस्तावासह ते सिंगापूरमध्ये असताना, आसामचे खासदार गौरव गोगोई काही तरुणांना पाकिस्तानी दूतावासात घेऊन जात असल्याचे दाखवणारा एक फोटो व्हायरल झाला. त्यावेळी अब्दुल बासित हे भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त होते.
हे देखील वाचा : AI व्हिडिओने आसामचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांनी बंदुकीतून केले मुस्लीम समुदायाला लक्ष्य
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, “राज्य सरकारला वाटते की या प्रकरणाची केंद्र सरकारच्या पातळीवर चौकशी झाली पाहिजे. त्यांनी ही एक गंभीर बाब असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की, संबंधित तथ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे. सरमा यांच्या मते, या प्रकरणात तीन व्यक्तींचा समावेश आहे: एक विद्यमान खासदार, त्यांची पत्नी, जी एक ब्रिटिश नागरिक आहे आणि अली तौकीर शेख नावाचा एक पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, “आसाम सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधीच एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केला की पाकिस्तानचा अली तौकीर शेख याने एका ब्रिटिश नागरिक आणि एका भारतीय खासदारासह भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, आता ते गृह मंत्रालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असा गौप्यस्फोट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
हे देखील वाचा : RSS ला आले ग्लॅमर? संघाच्या कार्यक्रमातील सलमान खानची उपस्थिती चर्चेत; मुस्लीमांबाबत राऊतांचा रोखठोक सवाल
आसाममध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे अशा वेळी ही घटना घडली आहे. अलिकडेच काँग्रेसने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात जमीन हडपल्याचा आरोप केला होता. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आसामच्या विविध भागात पसरलेल्या सुमारे १२,००० बिघा जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.






