फोटो सौजन्य - Social Media
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs), SSF आणि असम रायफल्समधील रायफलमन (GD) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये एकूण २५,४८७ पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. SSF मधील पदे संपूर्ण देशातून भरली जाणार असून इतर CAPFs मधील रिक्त जागा राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कोटानुसार भरल्या जातील.
या भरतीत BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF या दलांमध्ये पुरुषांसाठी 23,467 आणि महिलांसाठी 2,020 अशा एकूण 25,487 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रता म्हणून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेनुसार पुरुषांची उंची 170 सेमी आणि महिलांची 157 सेमी ठेवण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांना 80 सेमी छाती आणि 5 सेमी फुगवटा आवश्यक आहे. शारीरिक चाचणीत पुरुषांनी 5 किमी धाव 24 मिनिटांत तर महिलांनी 1.6 किमी धाव 8 मिनिटांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान असावी. आरक्षित प्रवर्गांसाठी शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल.
या पदांसाठी वेतनमान लेव्हल-3 नुसार प्रति महिना ₹21,700 ते ₹69,100 इतके राहणार आहे. अर्ज शुल्क सामान्य प्रवर्गासाठी ₹100 असून महिला, SC, ST आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून संपूर्ण सूट देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होणार आहे – संगणक आधारित परीक्षा (CBT), शारीरिक चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज तपासणी. परीक्षेला एकूण 60 मिनिटे दिली जातील व पेपरमध्ये 80 प्रश्नांसाठी 160 गुण असतील. निगेटिव्ह मार्किंगनुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिका मराठी सहित 13 भाषांमध्ये उपलब्ध असेल.
अर्ज करताना उमेदवारांनी 10वीची मार्कशीट, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच स्वाक्षरी असलेला पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर एक-वेळ नोंदणी (OTR) करून सुरू होते. लॉगिन केल्यानंतर ‘Constable (GD) Examination 2026’ लिंकवर जाऊन आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत. शुल्क भरल्यानंतर अंतिम सबमिशन करून फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवणे महत्त्वाचे आहे. SSC मार्फत येणारी ही मोठी भरती संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीकडे लक्ष द्यावे.






