
students screenign
याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व शिक्षकांनी ‘प्रशस्त २.०’ अॅपवरील १० प्रशिक्षणात्मक व्हिडीओ पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आतापर्यंत केवळ ४.४६ टक्के शिक्षकांनीच हे १० व्हिडीओ पाहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षकांसह विशेष शिक्षकां दिले निर्देश आहेत.
१ सप्टेंबर २०२६पासून प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘प्रशस्त २.०’ अॅपद्वारे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षकांना अॅपचा वापर, स्क्रीनिंगची पद्धत आणि विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती भरण्याबाबत अचूक माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्क्रीनिंग सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःला अद्ययावत करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
‘प्रशस्त २.०’ अॅपवरील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले १० व्हिडीओ पाहणे आवश्यक आहे. एका व्हिडीओचा कालावधी साधारण पाच मिनिटांचा असून सर्व १० व्हिडीओ मिळून सुमारे ५५ मिनिटांचा प्रशिक्षणात्मक भाग आहे. त्यामुळे शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करण्यास टाळाटाळ करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रीनिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि १ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग, अशा पद्धतीने पुढील कार्यवाही होणार आहे. आतापर्यंत प्रशिक्षण व्हिडीओ पाहणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प असल्याने उर्वरित शिक्षकांनी तातडीने प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.