फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Bal Drishti Scheme: फळा स्पष्ट दिसत नसल्याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा वेगळया प्रकारचा पहिला उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या १२०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे.
‘बाल दृष्टी’ हा उपक्रम अपवर्तनदोषाच्या निदान व उपचारांवर केंद्रित असून, तो आयुष्मान भारत अंतर्गत शालेय आरोग्य व कल्याण कार्यक्रमाशी संलग्न आहे. मुलांना अनेकदा दृष्टी स्पष्ट नसल्याचे सांगता येत नाही. अशा वेळी ते फळ्याजवळ बसणे, वाचन टाळणे अथवा फळ्यावरील मजकूर हळूहळू उतरविणे अशा वर्तनातून अडचणी व्यक्त करतात. मात्र, या लक्षणांचा अर्थ अनेकदा अनवधान किंवा अभ्यासातील दुर्लक्ष असा लावला जातो. ही स्थिती वेळीच ओळखून विद्यार्थ्यांना उपचारांशी जोडण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
देशात अंदाजे ९३ लाख मुले दृष्टीबाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’मधील २०२२ च्या अभ्यासानुसार, बालअंधत्वामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष नुकसान होते. अपवर्तनदोष आणि ॲम्ब्लायोपिया ही बालांधत्वाची प्रमुख कारणे असून, ७५ टक्क्यांहून अधिक दृष्टीदोष टाळता अथवा उपचारांद्वारे सुधारता येऊ शकतात.
फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘बाल दृष्टी’अंतर्गत २२७ महापालिका शाळांमधील ४० हजार २७० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. या शाळांमध्ये नोंद असलेल्या ५९ हजार १५० विद्यार्थ्यांपैकी ६८ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत तपासणी पोहोचली आहे. तपासणी झालेल्यांमध्ये २० हजार ३९० मुले आणि १९ हजार ८८० मुलींचा समावेश असून, दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांचा सहभाग जवळपास समान आहे.
तपासणीदरम्यान काही गंभीर नेत्रदोषही निदर्शनास आले आहेत. एका विद्यार्थ्याच्या एका डोळ्यात उणे ११.५० एसपीएच इतका निकटदृष्टीदोष आढळला, तर काही विद्यार्थ्यांच्या नोंदी उणे १६ एसपीएचपर्यंत आल्या आहेत. शून्य हे सामान्य दृष्टीमापन मानले जाते, तर उणे ६ पासून उच्च निकटदृष्टीदोषाची स्थिती सुरू होते. या पातळीवर काही सेंटीमीटरपलीकडील दृश्यही धूसर दिसू शकते. एका विद्यार्थ्यास मोतीबिंदू असल्याचेही निदान झाले असून, घरात किंवा वर्गात लक्षात न आलेले अन्य नेत्रविकारही तपासणीमुळे समोर आले.
उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३६१ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले आहेत. संशयित नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना ताडदेव रोडवरील व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कम्युनिटी आय क्लिनिकमध्ये सविस्तर तपासणीसाठी पाठविण्यात येते. या तपासणीनंतर चष्मा, तज्ज्ञ उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता निश्चित करण्यात येते. पालकांशी घरभेटी आणि शाळाभेटींद्वारे सातत्याने संपर्क ठेवून उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत चार विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
तपासणीत ३१ विद्यार्थ्यांना रंगदृष्टीदोष असल्याचे आढळले आहे. हा दोष दुरुस्त करता येत नसला, तरी त्याचे वेळेवर निदान झाल्यास पालक आणि शिक्षकांना अध्यापनपद्धतीत आवश्यक बदल करता येतात. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या आणि करिअरच्या निवडीबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासही ही माहिती उपयुक्त ठरते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाद्वारे तपासणी, संदर्भसेवा आणि घरभेटींद्वारे पाठपुरावा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका व व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पथकांच्या कार्याची दखल घेतली आहे. फळा दिसत नसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण अनवधान समजली जाण्यापूर्वीच त्यांना आवश्यक नेत्रसेवेशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे.






