फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौकटीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत यंदापासून दोन महत्त्वाचे उपक्रम देशभरातील शाळांमध्ये राबवले जाणार आहेत. करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक शालेय प्रारूप. या दोन उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यश मिळविणे नव्हे, तर त्यांना भविष्यात योग्य दिशा मिळावी, तणावाचे व्यवस्थापन करता यावे आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.
हब अँड स्पोक प्रारूप या संकल्पनेनुसार, काही निवडक शाळा ‘हब’ म्हणून नियुक्त केल्या जातील. या शाळांमध्ये विशेष प्रशिक्षित समुपदेशक व करिअर मार्गदर्शक उपलब्ध असतील. त्या परिसरातील इतर शाळा ‘स्पोक’ म्हणून या हब शाळांशी जोडल्या जातील. हब शाळांतील समुपदेशक संबंधित स्पोक शाळांतील विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे पर्याय समजावून सांगतील, त्यांना मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करतील आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहाय्य करतील. अशा प्रकारे ग्रामीण व दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन सहज मिळू शकेल.
हा उपक्रम ऑगस्ट 2025 पासून टप्प्याटप्प्याने देशभर सुरू होईल. यात शाळांची अधिकृत नोंदणी, शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण, समुपदेशन सत्रांचे आयोजन आणि करिअर मेळाव्यांचे नियोजन केले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी व्यापक दृष्टीकोन मिळेल तसेच शिक्षक व समुपदेशकांची क्षमता वाढेल. शाळांमध्ये समुपदेशन संस्कृती रुजवणे आणि सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना समान संधी देणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड हा एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, तो इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,100 हून अधिक करिअर पर्यायांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देतो. प्रत्येक करिअरसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्ये, उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगाराच्या शक्यता यांचे तपशीलवार वर्णन यात दिलेले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचण्या, वैयक्तिक समुपदेशन, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती आणि महाविद्यालयांची माहिती या डॅशबोर्डवर मिळेल. हा प्लॅटफॉर्म सर्व सीबीएसई शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असून cbsecareerguidance.com या संकेतस्थळावर नोंदणी करून याचा लाभ घेता येईल.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर नियोजनास स्पष्ट दिशा मिळणार आहे, तसेच त्यांचे मानसिक आरोग्य मजबूत राहण्यासाठी आवश्यक आधारही मिळेल. सीबीएसईचे हे पाऊल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.