फोटो सौजन्य - Social Media
कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) परीक्षांमध्ये मोठे बदल होत आहेत. यंदापासून परीक्षा केंद्रांची सोय उमेदवारांच्या सोयीच्या दृष्टीने १०० किमीच्या परिसरातच केली जाणार आहे. याआधी ही मर्यादा २०० किमीपर्यंत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचा त्रास कमी होणार आहे. तसेच कॉमन ग्रॅज्युएट लेव्हल (CGL)सह इतर महत्त्वाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पूर्वी परीक्षांची संख्या व परीक्षार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन दोन ते तीन शिफ्ट होत होत्या.
मात्र, शिफ्टनुसार पेपरची कठीणता वेगवेगळी असायची आणि त्यामुळे निकालात असमानता दिसत होती. आता आयोगाने नॉर्मलायझेशनचा नवा फॉर्म्युला लागू केला आहे. प्रत्येक शिफ्टमधील टॉप ५% विद्यार्थ्यांची निवड करून समानता राखली जाणार आहे.
परीक्षेतील सुरक्षेसाठी नवी तंत्रज्ञान पद्धती वापरल्या जात आहेत. परीक्षा केंद्र निवड, सिक्युरिटी मॅनेजमेंट, ॲप्लिकेशन प्रोसेस आणि प्रश्नपत्रिका तयार करणे या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या एजन्सींना दिल्या आहेत, जेणेकरून पारदर्शकता वाढेल. आधार कार्डद्वारे उमेदवारांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया परीक्षा देण्यापासून ते नोकरी मिळेपर्यंत सुरू राहील, ज्यामुळे नकल आणि फसवणूक थांबेल. पेन-ॲन्ड-पेपर मोडला आता पूर्णविराम देण्यात आला आहे. कारण यात पेपर लीक आणि गोंधळाची शक्यता जास्त असते.
SSC चेअरमन एस. गोपालकृष्णन यांनी स्पष्ट केले की, जुलैपासून या बदलांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, मात्र आता सिस्टमचे री-ऑडिट सुरू आहे, जेणेकरून सप्टेंबरमधील परीक्षा सुरळीत पार पडतील. सध्या ८०% विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे केंद्र मिळते आणि लवकरच ते प्रमाण ९०% पेक्षा जास्त नेण्याचा प्रयत्न आहे. या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासाचा ताण कमी होणार असून तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता येईल. आता उमेदवारांनी आपल्या तयारीची अंतिम टप्प्यातील तपासणी करून परीक्षा केंद्राची खात्री करून घ्यावी.