सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस (SUAS), इंदोर आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो प्रदर्शन २०२५, पृथ्वीपासून तारकांकडे: भारताचा अवकाश प्रवास’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय अवकाश दिनाच्या (२३ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू विनीत कुमार नायर, संचालक दुर्गेश मिश्रा, कुलसचिव मनीष झा तसेच इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ रवीकुमार वर्मा, दिनेशकुमार अग्रवाल आणि शालिनी गंगेले यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रदर्शनात इस्रोच्या अवकाश संशोधनातील ऐतिहासिक कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, आर्यभट्ट, भास्कर, मंगळयान, गगनयान यांसारख्या उपग्रहांची मॉडेल्स तसेच पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही प्रक्षेपकांची माहिती यात देण्यात आली. ‘स्पेस ऑन व्हील्स’ हे विशेष आकर्षण ठरले, ज्याद्वारे इस्रोची कार्ये प्रत्यक्ष पाहता आली.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. पोस्टर मेकिंग, रंगोली, प्रश्नमंजुषा, वादविवाद, आयडिया हॅकाथॉन आणि विज्ञान मॉडेल स्पर्धा अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रायन इंटरनॅशनल आणि डीपीएससह अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण योगदानासाठी गौरविण्यात आले.
या प्रदर्शनादरम्यान इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना उपग्रहांच्या कार्यप्रणाली, अवकाश मोहिमांचे महत्त्व आणि अवकाश तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनावर होणारा प्रभाव याची सविस्तर माहिती दिली. रवीकुमार वर्मा यांनी चांद्रयान-३ च्या यशाचा अभिमान व्यक्त केला, तर शालिनी गंगेले यांनी इस्रोतील महिला सक्षमीकरण आणि भविष्यातील दृष्टिकोन अधोरेखित केला. शालिनी गंगेले यांनी सांगितले की, “विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन अहमदाबाद, गुजरात येथून सिंबायोसिसमार्फत इंदोरमध्ये आणण्यात आली. विद्यार्थ्यांना इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरी, भावी दृष्टिकोन आणि इस्रोमधील महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती मिळाली.”
समारोप सोहळ्यात मनीष झा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कुतूहल आणि नाविन्याची प्रेरणा जागृत होते, असे सांगितले. दुर्गेश मिश्रा, नेहा गुप्ता आणि ब्रजेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाने केवळ भारताच्या अवकाश संशोधनातील यशाचा उत्सव साजरा केला नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी नवचैतन्य व प्रेरणादेखील निर्माण केली.