फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Divya Mittal: उत्तर प्रदेशच्या २०१३ च्या बॅचच्या चर्चेत असलेल्या IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका मोठ्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांची ही कथा आजच्या तरुणांसाठी एक मोठा आदर्श आहे. त्यांचा परदेशातील नोकरी सोडणे आणि युपीएससी (UPSC) सारखी कठीण परीक्षा क्रॅक करणे, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जाणून घेऊया कोण आहेत IAS दिव्या मित्तल आणि कसा राहिला त्यांचा करिअर प्रवास.
दिव्या मित्तल या मूळच्या हरियाणातील रेवाडीच्या राहणाऱ्या आहेत. अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या दिव्या यांनी IIT दिल्लीमधून बीटेकची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी IIM बंगळुरूमधून एमबीए (MBA) देखील केले. इतके उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना परदेशात नोकरीची संधी मिळाली आणि त्या लंडनला गेल्या.
एमबीए पूर्ण केल्यानंतर दिव्या मित्तल यांना लंडनच्या प्रसिद्ध कंपनी जेपी मॉर्गनमध्ये लाखांच्या पगाराची नोकरी मिळाली. करिअरच्या दृष्टीने ही कोणत्याही तरुणासाठी स्वप्नवत अशी संधी होती. परंतु, परदेशात दीर्घकाळ राहूनही दिव्या यांचे मन तिथे रमले नाही. देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती, ज्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
दिव्या मित्तल यांनी लंडनची घसघशीत पगाराची नोकरी सोडली आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष युपीएससीच्या तयारीवर केंद्रित केले. विशेष म्हणजे त्यांनी ही तयारी एकट्याने नाही, तर त्यांचे पती गगनदीप सिंग यांच्यासह केली. गगनदीप सिंग हे देखील अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे होते आणि दोघांनी मिळून प्रचंड मेहनत घेतली. पती गगनदीप सिंग यांनी २०११ मध्ये आयएएस परीक्षा पास केली होती.
दिव्या मित्तल यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास करून IPS अधिकारी होण्याचा मान मिळवला. यानंतर त्यांनी हार मानली नाही आणि २०१३ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. या वेळी त्यांनी ६८ वा क्रमांक मिळवला आणि त्या IAS अधिकारी बनल्या. कमी वेळेत दोनदा यूपीएससी क्रॅक करणे त्यांच्या कठोर मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष देतो.
आयएएस बनल्यानंतर दिव्या मित्तल यांची उत्तर प्रदेश कॅडरमध्ये नियुक्ती झाली. त्यांनी संत कबीर नगर, मिर्झापूर आणि बस्ती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून काम पाहिले. प्रत्येक जिल्ह्यातील त्यांचा कार्यकाळ प्रशासकीय कामाच्या दृष्टीने यशस्वी मानला जातो. यानंतर त्यांना देवरिया जिल्ह्याच्या डीएम पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती.
देवरियाच्या डीएम असताना दिव्या मित्तल एका पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. या दरम्यान रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आणि कामात दिरंगाई झाल्यामुळे त्यांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल ऐकवले होते. कडक उन्हातही त्या स्वतः मैदानात उतरल्या आणि अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांची ही सक्रियता आणि कर्तव्यकठोरता सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात पसंतीस उतरली होती.
IAS दिव्या मित्तल यांची ही कहाणी हे सिद्ध करते की, चांगला पगार आणि आरामदायक आयुष्य सोडूनही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. आयआयटी आणि आयआयएम सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर परदेशातील नोकरी सोडून देशसेवेचा मार्ग निवडणे सोपे नव्हते. म्हणूनच आज दिव्या मित्तल यांची गणना अशा प्रेरणादायी अधिकाऱ्यांमध्ये होते, ज्यांची यशोगाथा प्रत्येक यूपीएससी इच्छुकाला प्रेरित करते.






