सौजन्य - सोशल मिडीया
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि केंद्राच्या ‘निपुण भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हा मेळावा वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहे. जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या शनिवारी शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन केले जाईल. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर आयोजनाची प्राथमिक जबाबदारी राहणार आहे.
मेळाव्यामध्ये पालकांच्या मातांना क्लिष्ट शासकीय भाषेत निमंत्रण न देता स्थानिक बोलीभाषेत वैयक्तिक फोन किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वाचन-लेखन, गणितीय कौशल्ये, घरातील अभ्यासाचे वातावरण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, बालसुरक्षा आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाबाबत मातांना खेळ, कृती आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल.
मेळाव्यानंतर ठरविलेल्या कृतींची शाळास्तरावर नोंद
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या त्रुटी किंवा तक्रारींवर नकारात्मक चर्चा न करता सकारात्मक संवादावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेळाव्यानंतर मातांची उपस्थिती, चर्चेतील मुद्दे, छायाचित्रे आणि ठरविलेल्या कृतींची शाळास्तरावर नोंद ठेवावी लागणार असून, आवश्यक बाबींचा समावेश शाळा विकास आराखड्यात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा : तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
मुलांसोबत रोज २० मिनिटे उपक्रम
माता-पालकांनी मुलांच्या अभ्यासाबाबत त्यांच्याशी संवाद साधावा. वाचन-लेखन, गोष्टींची पुस्तके, आरोग्यदायी सवयी तसेच आवडता-नावडता विषय याबाबत चर्चा करावी, यावर भर देण्यात आला आहे. ‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ असा उपक्रम राबविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.






