फोटो सौजन्य - Social Media
निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी पक्षीमित्र संमेलनासारखे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच निसर्गातील विविध घटकांची ओळख होते. निसर्ग वाचनाची आणि अभ्यासाची गोडी निर्माण होण्यास याचा मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन बुलढाणा वनविभागाच्या उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी केले. मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी यांच्या पुढाकाराने तसेच बुलढाणा वनविभाग, अकोला वन्यजीव विभाग, निसर्ग कट्टा अकोला आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या सहकार्याने बुलढाणा येथे पहिल्यांदाच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. मयूर कुंज येथे आयोजित या संमेलनात ६५ विद्यार्थ्यांसह २५ पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संमेलनाची सुरुवात सकाळी पक्षी निरीक्षण उपक्रमाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या सभोवतालच्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती वाढण्यासोबतच पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. बुलढाणा वनविभागाच्या उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राहुल चव्हाण यांना कृतज्ञता पुरस्कार, तर चिमुकल्या मल्हार हिंगणे याला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षपदी सईशा काळवाघे हिची निवड करण्यात आली होती.
संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या निवडक सादरीकरणाचाही समावेश करण्यात आला. वेदांत पायघन आणि शौर्या साठे यांनी आपल्या अनुभवांचे प्रभावी सादरीकरण केले. तसेच अमोल सावंत, डॉ. निखिल जवरे आणि क्षितिज गजेंद्र निकम यांनी पक्षी, त्यांचे अधिवास, संरक्षणाचे महत्त्व आणि जैवविविधता यासंबंधी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संमेलनाच्या निमित्ताने डॉ. गजेंद्र निकम व क्षितिज निकम यांच्या पक्षी छायाचित्रांचे तसेच डॉ. विनायक हिंगणे व मल्हार हिंगणे यांच्या पक्षी रेखाटनांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण अभ्यासक शीला किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन हा उपक्रम सुंदर, नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात बोलताना मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली गजेंद्र निकम यांनी चिमुकल्यांना निसर्गाची जवळून ओळख व्हावी आणि त्यांच्या मनात संवर्धनाची भावना रुजावी, हाच या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे, प्रकाश सावळे, निसर्ग कट्टाचे गौरव झटाले, समर्थ भुसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शलाका पवार, राधा देशमुख, पार्थ पवार व समर्थ भुसारी यांनी केले, तर रविकिरण टाकळकर यांनी आभार प्रदर्शन केले.






