फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) संदर्भातील एका आयटी प्रोफेशनलची पोस्ट सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. स्वतःला जावा डेव्हलपर असल्याचे सांगणाऱ्या या युजरने दावा केला आहे की, कंपनीत साडेपाच वर्षे काम करूनही त्याची पगारवाढ होण्याऐवजी उलट मासिक पगार कमी झाला आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील करिअर ग्रोथ आणि परफॉर्मन्स सिस्टिमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रेडिट फोरमवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, संबंधित युजरने २०२० साली TCS मध्ये नोकरीला सुरुवात केली होती. त्या वेळी त्याचा सुरुवातीचा मासिक पगार २५ हजार रुपये होता. मात्र, २०२६ मध्ये साडेपाच वर्षांचा अनुभव असूनही त्याची ‘इनहँड’ सॅलरी घटून २२ हजार ८०० रुपयांवर आली असल्याचा दावा त्याने केला आहे. विशेष म्हणजे, अनुभव वाढूनही पगार कमी होणे ही बाब अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे.
या युजरने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तो टियर-३ कॉलेजमधून पदवीधर आहे. TCS मध्ये रुजू झाल्यानंतर आयटी कौशल्ये विकसित करण्याऐवजी त्याने सरकारी नोकरीच्या तयारीकडे अधिक लक्ष दिले. परिणामी, कंपनीत त्याला सातत्याने ‘C’ आणि ‘D’ असे कमी परफॉर्मन्स बँड मिळत गेले. जुलै २०२५ मध्ये त्याला परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (PIP) अंतर्गत ठेवण्यात आले. मात्र, मेहनत करून तो एका नवीन प्रोजेक्टमध्ये असाइन झाला.
यावेळी त्याने आपल्या मॅनेजरला आपण PIP वर असल्याची माहिती दिली नाही, असेही त्याने नमूद केले आहे. PIP कालावधी कोणतीही टर्मिनेशन कारवाई न होता पूर्ण झाला, मात्र त्याची अप्रेजल प्रक्रिया थांबवण्यात आली. याचा थेट परिणाम त्याच्या पगारावर झाला, असे तो सांगतो.
जानेवारी २०२६ पासून त्याने स्वतःला जावा बॅकएंड डेव्हलपर म्हणून पुढे सादर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो इतर कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ लागला. मात्र, तेथेही अडचणी समोर आल्या. त्याच्या मते, HR अधिकारी त्याची सॅलरी स्लिप पाहून संशय व्यक्त करतात आणि पुढील ऑफरवर चर्चा थांबवतात. त्यामुळे आयटी क्षेत्रात टिकून राहणे कठीण होत असल्याची चिंता त्याने पोस्टच्या शेवटी व्यक्त केली असून, कम्युनिटी कडून मार्गदर्शन मागितले आहे.
ही पोस्ट अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून अनेक युजर्सनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया आणि सल्ले दिले आहेत. एका युजरने सुचवले की, सुरुवातीला लहान पगारवाढीसह स्टार्टअप्समध्ये जाण्याचा प्रयत्न करावा, कारण सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्स एका वर्षात तीन वर्षांचा अनुभव देतात. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, पाच वर्षांच्या अनुभवानंतर २२ हजारांचा पगार अत्यंत चिंताजनक असून, अशा परिस्थितीत MBA हा एक पर्याय ठरू शकतो.
ही संपूर्ण चर्चा आयटी इंडस्ट्रीतील करिअर ग्रोथ, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आणि पगारवाढीच्या प्रक्रियेवर नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करत आहे.






