फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IBPS PO Recruitment 2026 notification : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड (IBPS) ने ६७१५ प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Notification) जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या ५२०८ पदांच्या तुलनेत यंदाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या भरतीसाठी इच्छुकांना २१ जुलै २०२६ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.
देशातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही ६ हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रमुख बँकांनुसार जागा खालीलप्रमाणे आहेत:
1. बँक ऑफ बडोदा: १९०० जागा
2. कॅनरा बँक: १५०० जागा
3. बँक ऑफ महाराष्ट्र: ११०० जागा
4. पंजाब नॅशनल बँक: ५०४ जागा
Google सोडून सुरू केला स्टार्टअप! अब्जावधींच्या एआय क्षेत्रात युसूफ इम्रान यांनी कशी मारली बाजी?
या भरतीसाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असणे अनिवार्य आहे. १ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल, ज्यामध्ये SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC (नॉन-क्रिमीलेअर) उमेदवारांना ३ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सूट मिळेल.
यंदा ‘IBPS PO’ च्या मुख्य परीक्षेत (Mains Exam) महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुख्य परीक्षेत १४५ वस्तुनिष्ठ प्रश्न होते, जे आता वाढवून १७० करण्यात आले आहेत. मात्र, एकूण गुण (२००० गुण) आणि वेळ (१६० मिनिटे) यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्येही (निबंध आणि आकलन) बदल झालेला नाही. प्राथमिक परीक्षा (Prelims) ऑगस्ट २०२६ मध्ये, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर २०२६ मध्ये घेतली जाईल.
अर्ज शुल्क: SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १७५ रुपये, तर जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यशस्वी उमेदवारांना नियमानुसार, भत्त्यांसह ४८,४८० रुपये मूळ वेतन दिले जाईल.






