फोटो सौजन्य - Social Media
आयआयएम मुंबईने (Indian Institute of Management Mumbai) सर्जनशीलता आणि व्यवस्थापन शिक्षणाचा संगम घडवून आणत गायक-कंपोजर पद्मश्री कैलाश खेर यांच्या कला अकॅडमीसोबत हातमिळवणी केली आहे. या सहकार्याद्वारे आर्टेप्रेन्युअर पीजीडीएम (Artepreneur PGDM) हा एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रम सुरू होणार आहे.
परफॉर्मिंग आर्ट्ससाठी क्रिएटिव्ह लीडरशिप या संकल्पनेवर आधारित हा कोर्स जून २०२६ ते मे २०२७ पर्यंत चालणार असून, दूरदृष्टी असलेल्या कलाकारांना, सर्जनशील उद्योजकांना आणि कलात्मक नवोपक्रमाला व्यवस्थापन कौशल्यांशी जोडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम डिझाइन करण्यात आला आहे. थिएटर, संगीत, नृत्य आणि योग यांचा संगम व्यवस्थापनाच्या चौकटीत घडवत हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्ता, अनुकूलता आणि लवचिकतेसह खऱ्या आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता देतो. वैयक्तिक ब्रँडिंग, प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, मार्केटिंग, नेतृत्व आणि उद्योजकता यांचा संगम असलेल्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी भक्कम पाया मिळेल.
आयआयएम मुंबईचे डायरेक्टर प्रो. मनोज के. तिवारी यांनी या भागीदारीबद्दल बोलताना सांगितले की, “कलासोबतचे आमचे सहकार्य सहानुभूतीशील, नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनकारी नेते जोपासण्याच्या आयआयएम मुंबईच्या ध्येयावर आधारित आहे. आर्टेप्रेन्युर पीजीडीएमची रचना सर्जनशील नेतृत्वाला जोपासण्यासाठी केली आहे, जे आजच्या जगाला आवश्यक असलेली कलात्मकता आणि धोरणात्मक दृष्टी यांचे ते महत्त्वाचे मिश्रण आहे.”
कैलाश खेर यांनीदेखील या उपक्रमाचे स्वागत केले असून, “परफॉर्मिंग आर्ट्समध्ये केवळ आपण स्टेजवर कसे सादर करतो हेच नव्हे तर आपल्या समुदायांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी आपण कसे नेतृत्व करतो हे बदलण्याची शक्ती आहे. व्यवसाय शिक्षणात सर्जनशील नेतृत्वाला आघाडीवर आणण्यासाठी हे सहकार्य एक उल्लेखनीय पाऊल आहे,” असे ते म्हणाले. भारतातील आघाडीच्या व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून आयआयएम मुंबईने या अभिनव शैक्षणिक उपक्रमातून पुन्हा एकदा नव्या दृष्टीकोनाला आकार दिला आहे.