नव्या केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या एसटी बसला राजमाता जिजाऊ नाव देण्यात येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या नवीन बसचा रंग हा भगवा आणि शुभ्र पांढरा असणार आहे. केशरी व पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.
इतिहासाचा सन्मान, प्रवासात आराम
याबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब! त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटी च्या नवीन बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे. अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.” असे सरनाईक म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान
अधिक आसन क्षमता — प्रवाशांना मोठा दिलासा
सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण 40 प्रवासी इतकी असताना, नव्या बसेसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल 15 प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे. असे मंत्री सरनाईक म्हणाले.
हे देखील वाचा : ११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’
परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम
“राजमाता जिजाऊ” हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.






