सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण ६५ जागांपैकी महायुतीने तब्बल ४७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. या घवघवीत यशामुळे शहरातील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने झुकली असून, सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र महापौर पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग असे जाहीर झाल्याने, भाजपमध्ये महापौरपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.
भाजपातील तब्बल २७ नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक असल्याने, योग्य उमेदवार निश्चित करणे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठे आव्हान ठरले होते. विविध गट, स्थानिक समीकरणे, अनुभव आणि संघटनात्मक संतुलन यांचा विचार करताना नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागली. अखेर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौरपदासाठी उदय धातुंडे, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. या घोषणेनंतर दोन्ही उमेदवारांनी अधिकृतपणे आपले अर्ज दाखल केले.
सहल ‘रणनीतीचा भाग’ म्हणून पाहिली जाते
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये, तसेच सर्व नगरसेवक एकत्र राहावेत या उद्देशाने महायुतीने सहलीचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात ही सहल ‘रणनीतीचा भाग’ म्हणून पाहिली जात असून, निवडीच्या प्रक्रियेत ऐक्य दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक-नगरसेविकांची परस्पर ओळख वाढावी, संघटनात्मक संवाद मजबूत व्हावा आणि निवडणुकीचा ताण काहीसा कमी व्हावा, या हेतूनेही ही सहल आखण्यात आल्याचे समजते. आंबा येथे मुक्कामादरम्यान विविध बैठका, अनौपचारिक चर्चा आणि संवादाचे सत्र होणार असून, सोमवारी सकाळी सर्व नगरसेवक एकत्रपणे इचलकरंजीत परतणार आहेत. त्यानंतर सभागृहात महापौर व उपमहापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.
सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने, उदय धातुंडे आणि अनिल डाळ्या यांची निवड औपचारिकता ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदाची निवड ही औपचारीक उरली आहे. याकडे शहरातील नागरिक, राजकीय निरीक्षक आणि प्रशासन यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. नव्या महापौर व उपमहापौरांकडून शहराच्या विकासाला गती देण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, आगामी काळात इचलकरंजीच्या कारभाराची दिशा काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
हे सुद्धा वाचा : मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…
नाराजी दूर होणार का?
उदय धातूंडे यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर होताच काही जेष्ठ नगरसेवकांची नाराजी लपून राहिली नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून काहींनी जाणे पसंत केले. तर एकाने माध्यम प्रतिनिधींसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली. सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीवेळी या नाराज नगरसेवकांची नाराजी नेत्यांकडून कशी दूर केली जाणार, हे आता पहावे लागणार आहे.






