फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यातर्फे देण्यात आली. कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रमासाठी २६,०६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये या प्रवेश परीक्षेसाठी ३५,०७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे यंदाही नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवेश परीक्षा ८ मे रोजी होणार असून, विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (Computer Based Test) पद्धतीने ऑनलाईन घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नोंदणी वेळापत्रक तसेच इतर आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अद्ययावत माहिती आणि तपशीलवार वेळापत्रकासाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रम हा बारावीनंतर थेट कायद्याच्या शिक्षणात प्रवेश देणारा अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. कायदा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी ही मुदतवाढ लक्षात घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांनी नियमित अद्ययावत माहिती तपासावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
काय असते LLB CET टेस्ट?
एलएलबी सीईटी (LLB Common Entrance Test) ही कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत आयोजित केली जाते. बारावीनंतर पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य असते. ही परीक्षा संगणकाधारित (Computer Based Test) पद्धतीने ऑनलाईन घेतली जाते. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (Multiple Choice Questions – MCQ) स्वरूपाची असते. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. साधारणतः परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो.






