फोटो सौजन्य - Social Media
सरकारी बँकेत सीनियर लेव्हलवर नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda – BOB) मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. बँकेच्या विविध विभागांमध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर यांसारख्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठीचे जाहिरातपत्र जारी झाले असून 19 सप्टेंबर 2025 पासून अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.bank.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 9 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेद्वारे बँकेत कॉर्पोरेट अकाउंट अँड टॅक्सेशन तसेच ट्रेड अँड फॉरेक्स विभागांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये चीफ मॅनेजर इन्व्हेस्टर रिलेशन या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकॉनॉमिक्स/कॉमर्स विषयात पदवी असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स आणि फॉरेक्स रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी चालेल, मात्र किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. तर सीनियर मॅनेजर (फॉरेक्स) पदासाठी 5 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासंबंधी अधिक तपशील उमेदवारांना अधिकृत जाहिरातीमध्ये उपलब्ध होईल.
या भरतीतून बँक ऑफ बडोदामध्ये सीनियर लेव्हलवर स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची संधी आहे. योग्य पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी नक्की साधावी.