फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सध्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्य, कोळसा उद्योग, टेलिकॉम आणि सुरक्षा दल अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये हजारो पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
सैन्यात ‘अग्निवीर’ भरती अंतर्गत सुमारे २५,००० पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लर्क, ट्रेड्समन अशा विविध पदांचा यात समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ असून उमेदवारांचे वय १७.५ ते २१ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
याशिवाय महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) मध्ये ६६७ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर ओव्हरमन, मायनिंग सरदार आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवारांकडे मायनिंग इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी, तसेच संबंधित अनुभव आणि वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ आहे.
टेलिकॉम क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये १२० पदांसाठी सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी टेलिकॉम क्षेत्रातील पदवीधर तसेच सीए/सीएमए पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे.
तसेच सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये १०६० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध कॉन्स्टेबल पदांसाठी १० वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२६ आहे.
एकूणच, १० वीपासून पदवीधरांपर्यंत सर्व स्तरांवरील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. वेळ न दवडता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिले पाऊल टाकावे.






