
govt job
Govt Jobs Mega Alert: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, देशातील विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), रेल्वे भरती मंडळ (RRB), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये अनुभवी व्यावसायिकांपासून ते १२ वी उत्तीर्ण, पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवीधारकांपर्यंतच्या सर्व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. काही भरतींसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, काहींसाठी नोंदणी सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार योग्य ती भरती निवडून अंतिम मुदतीची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ESE) २०२७ ही अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आयोगाने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखांमध्ये एकूण ४८० पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख (आज) ६ ऑक्टोबर २०२६ आहे. यूपीएससीकडून प्राथमिक परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी, तर मुख्य परीक्षा १८ जून २०२७ रोजी आयोजित केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे.
फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी पीएमबीआयने (PMBI) कंत्राटी पदांची भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत एकूण १७८ पदांवर भरती केली जाईल, ज्यामध्ये फार्मासिस्ट, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर यांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अर्ज शुल्क १०० रुपये आहे. उमेदवारांनी विहित अर्ज भरून तो ‘सीईओ, पीएमबीआय, नवी दिल्ली’ या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या युवकांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) क्रीडा कोट्याअंतर्गत भरती जाहीर केली आहे. यामध्ये हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) अशा एकूण ५२१ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होत आहेत. अर्ज आणि शुल्क सादर करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे, तर अर्जातील दुरुस्त्या १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान करता येतील. पात्र खेळाडू विहित क्रीडा आणि पात्रता निकष पूर्ण करून अर्ज करू शकतात.
खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत पदवीधर आणि पदवीपूर्व उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये २७५० मालगाडी व्यवस्थापक (Goods Train Managers), ५६ मुख्य वाणिज्यिक-सह-तिकीट पर्यवेक्षक (Chief Commercial-cum-Ticket Supervisors), ३०० कनिष्ठ लेखा सहाय्यक-सह-टंकलेखक (Junior Accounts Assistant-cum-Typists) आणि ३७१ वरिष्ठ लिपिक-सह-टंकलेखक (Senior Clerk-cum-Typists) यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२६ आहे. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी १६८८ पदवीपूर्व पदांकरिता भरती होणार असून, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करता येतील.