फोटो सौजन्य - Social Media
कायदा (Law) क्षेत्र हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नव्हे, तर विषयाची सखोल समज, विश्लेषण क्षमता आणि समाजाबद्दलची जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते. वकिली, कॉर्पोरेट लॉ, न्याय सेवा, सरकारी नोकऱ्या अशा विविध संधींमुळे आज अनेक विद्यार्थी लॉ क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. मात्र, १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे BA Law करावे की LLB? दोन्ही कोर्स कायद्याशी संबंधित असले, तरी त्यांचा अभ्यासक्रम, कालावधी आणि करिअरच्या संधी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे योग्य कोर्सची निवड न केल्यास पुढे गोंधळ आणि वेळेची नासाडी होण्याची शक्यता असते.
BA Law हा एक पदवी (Undergraduate) अभ्यासक्रम असून तो विद्यार्थी १२वी नंतर करू शकतात. या कोर्समध्ये कला शाखेतील विषय आणि कायद्याची प्राथमिक ओळख एकत्र दिली जाते. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सार्वजनिक प्रशासन यांसोबत भारतीय कायदा प्रणाली, लीगल रायटिंग आणि रिसर्च यांचा अभ्यास केला जातो.
साधारणपणे BA Law कोर्सचा कालावधी ३ वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना कायद्याची मूलभूत समज मिळते, मात्र थेट वकिली करण्याचा अधिकार मिळत नाही. BA Law पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी लीगल असिस्टंट, लॉ रिसर्चर, एनजीओ, कॉर्पोरेट ऑफिस, सरकारी विभाग अशा विविध क्षेत्रांत करिअर करू शकतात.
LLB ही एक व्यावसायिक (Professional) कायद्याची पदवी असून वकील बनण्यासाठी ही पदवी आवश्यक असते. LLB पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी बार काउंसिल ऑफ इंडिया (BCI) मध्ये नोंदणी करून अधिकृत वकील (Advocate) होऊ शकतात.
LLB मध्ये घटस्फोट व कौटुंबिक कायदा, कंपनी लॉ, करार कायदा, फौजदारी कायदा, राज्यघटना, सिव्हिल प्रोसीजर कोड (CPC) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा सखोल अभ्यास केला जातो. या कोर्ससाठी प्रवेश मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी CLAT, AILET किंवा विद्यापीठस्तरीय प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
LLB पूर्ण केल्यानंतर वकील, कॉर्पोरेट लॉयर, सरकारी नोकऱ्या, न्यायिक सेवा (Judicial Services) अशा विविध करिअर संधी उपलब्ध होतात. जर तुम्हाला थेट वकील बनायचे असेल, न्यायालयात प्रॅक्टिस करायची असेल, तर LLB हा अनिवार्य आणि योग्य पर्याय आहे. मात्र, जर तुम्हाला कायद्याची प्राथमिक समज घेऊन सामाजिक, प्रशासकीय किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे असेल, तर BA Law हा चांगला पर्याय ठरू शकतो.
एकंदरीत, LLB किंवा BA Law यापैकी कोणता कोर्स निवडायचा हे विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टांवर अवलंबून आहे. मात्र, वकिलीच्या करिअरसाठी LLB करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.






