फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MBBS Intern Stipend Hike: महाराष्ट्रातील एम.बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह विविध प्रश्नांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही महिन्यांपासून पाठपुरावा करत असून शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करावे, तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यावेतनाच्या अनियमिततेवर नियंत्रण आणून सर्व इंटर्न डॉक्टरांना नियमानुसार विद्यावेतन मिळावे, अशा मागण्या अभाविपने मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने पालिका सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संबंधित महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यावेतनाच्या अनियमिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यावेतनवाढीच्या मागणीसंदर्भातील आर्थिक व कायदेशीर बाबींची तपासणी करण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल आणि दिवाळीनंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले, असे अभाविपकडून सांगण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात एम.बी. बी. एस. इंटर्न डॉक्टरांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागते. रुग्णालयांमधील त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदारी लक्षात घेता त्यांना मिळणारे सध्याचे ₹ १८ हजार विद्यावेतन अपुरे आहे.
तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्न डॉक्टरांना विद्यावेतन वेळेवर न मिळणे, विद्यावेतनात अनियमितता असणे अशा तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे विद्यावेतनवाढीसोबतच खासगी महाविद्यालयांमधील या अनियमिततेवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी अभाविप कडून यावेळी करण्यात आली.
यावेळी अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “एमबीबीएस इंटर्न डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवेची मोठी जबाबदारी पार पाडतात. असे असतानाही त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे विद्यावेतन अपुरे आहे. अठरा हजारावरून ₹३० हजार विद्यावेतनवाढ ही केवळ आर्थिक मागणी नसून इंटर्न डॉक्टरांच्या कामाला आणि जबाबदारीला योग्य न्याय देण्याची मागणी आहे.
या प्रश्नावर प्रशासनासोबत प्रत्यक्ष बैठक व्हावी आणि संबंधित विभागांपर्यंत विद्यार्थ्यांची बाजू पोहोचावी यासाठी अभाविपने सातत्याने पाठपुरावा केला. बैठकीत हा त्या पाठपुराव्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, केवळ आश्वासन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. दिवाळीनंतर विद्यावेतनवाढीबाबत ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत अभाविपचा पाठपुरावा सुरूच राहील.”
Ans: शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: विद्यावेतनवाढीच्या मागणीसंदर्भातील आर्थिक व कायदेशीर बाबींची तपासणी करून दिवाळीनंतर यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.
Ans: खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यावेतनात होणाऱ्या अनियमिततेवर आणि वेळेवर विद्यावेतन न मिळण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.






