फोटो सौजन्य - Social Media
राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. अशातच विरारमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपल्या घरी नेल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने या उत्तरपत्रिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिक्षिकेच्या घरातील देव्हाऱ्यातून अचानक आग लागली आणि काही क्षणांत तिच्या घरात ठेवलेल्या १७५ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य काय असेल, यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना विरारच्या गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक मंडळाकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण या प्रकाराला शिक्षिकेची हलगर्जीपणा मानत आहेत, तर काही जण ही एक दुर्दैवी दुर्घटना असल्याचे सांगत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली असून, परीक्षांच्या निकालांवर त्याचा काय परिणाम होईल, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून यावर काय तोडगा निघेल, विद्यार्थ्यांना काय पर्याय दिला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शिक्षण मंडळ आणि प्रशासन यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
या १७५ उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेच्या असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स’ याला विषयांच्या या उत्तरपत्रिका होत्या. तपास करता ही आग देवघराला लागली त्यानंतर पसरून यात उत्तरपत्रिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. उत्तरप्रतिका जळाल्याच्या या प्रकरणवार शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,” मुळात, शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका घरामध्ये घेऊन जाणेच चुकीचे आहे. हे कायद्यात बसत नाही. विरारमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व दोषींवर कारवाई केली जाईल.”
मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की,” विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांचे गुण सुरक्षित आहेत.” त्यांचे म्हणणे आहे की उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. तसेच गुणपत्रिकाही तयार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. या प्रकरणात दोषी असणाऱ्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.