फोटो सौजन्य - Social Media
लोकभवनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात एम.ए. (डेव्हलपमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभय आळशी या विद्यार्थ्याने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला.
ही राज्यस्तरीय स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शनिवारी पार पडली. राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व या स्वरूपामुळे स्पर्धकांची विषय समज, भाषेवरील प्रभुत्व, मांडणीची शैली आणि विचारांची स्पष्टता यांची कसोटी पाहिली गेली.
स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या ‘स्त्री–पुरुष समानता : समकालीन वास्तव’ या विषयावर अभय आळशी याने ७ मिनिटांच्या निर्धारित वेळेत अत्यंत प्रभावी, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण केले. समाजातील बदलती मानसिकता, समानतेसमोरील आव्हाने, स्त्री–पुरुष समानतेचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून केलेला सखोल विचार यामुळे अभयचे भाषण विशेष ठरले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि स्पष्ट विचारमांडणीने परीक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेतील यशाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी अभय आळशी याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी अभयच्या यशामुळे विद्यापीठाची मान उंचावल्याचे सांगत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभय आळशी याला या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी व प्रथम पुरस्कारप्राप्त वक्ता विवेक वारभुवन तसेच सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विषयाची सखोल तयारी यामुळे हे यश मिळाल्याचे अभयने सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये सातत्याने घवघवीत यश मिळवून विद्यापीठाची परंपरा कायम ठेवली आहे. या वक्तृत्व स्पर्धेतील यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्य, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढीस लागण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.






