फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) वतीने आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव ‘अन्वेषण’मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने २ सुवर्ण आणि २ कांस्य अशी एकूण ४ पदके पटकावत आपली संशोधनातील गुणवत्ता अधोरेखित केली. २० आणि २१ जानेवारी रोजी गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठ येथे या संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यांतील एकूण ३२ विद्यापीठांचा सहभाग होता. विविध विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प पोस्टर व मौखिक सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केले.
मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या एकूण ६ गटांपैकी ४ गटांमध्ये प्राविण्य मिळवले. मूलभूत शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे या गटांत विद्यापीठाला २ सुवर्ण पदके मिळाली, तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच आरोग्य विज्ञान या गटांत २ कांस्य पदकांची कमाई झाली. या संशोधन महोत्सवाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन संस्कृती बळकट करणे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्यांच्या कलागुणांना वाव देणे, तसेच राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धांमध्ये सहभाग वाढवणे या व्यापक उद्देशाने २००८ पासून ‘अन्वेषण’ या संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कृषी व मूलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषधशास्त्र, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य-व्यवस्थापन-विधी तसेच आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा गटांत ही स्पर्धा आयोजित केली जाते.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागींचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञ म्हणून डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. सुनीता शैलेजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रुपा राव, डॉ. मनीष देशमुख, डॉ. ललिता मुतरेजा, डॉ. वैशाली निरमळकर, डॉ. प्रज्ञा कोलेकर आणि डॉ. रसिका पवार यांनी योगदान दिले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विनितकुमार बडगुजर, डॉ. सुरेखा एंट्री आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
मूलभूत शास्त्रे गटात राहुल मिश्रा यांनी ‘मलेरियाचे नियंत्रण’ या संशोधन प्रकल्पासाठी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. सामाजिक शास्त्रे गटात तेजस पवार यांनी ‘समाजाच्या विविध परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाचे वर्गीकरण’ या विषयावरील सादरीकरणासाठी सुवर्णपदक मिळवले. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात ‘अतिथंड माध्यमाविना कार्य करणारे नावीन्यपूर्ण साधन’ या संकल्पनेवर महेश पुजारी, एकता कदम आणि अमर वर्मा यांनी सादरीकरण करत कांस्यपदकाची कमाई केली. तर आरोग्य विज्ञान गटात सविता मुलभिले आणि वर्षा छाब्रिया यांनी ‘मूत्र विश्लेषक’ या प्रकल्पासाठी कांस्यपदक पटकावले.






