फोटो सौजन्य- iStock
अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांच्या विद्यार्थीसंख्येत मोठी घट झाल्याचे समोर येत आहे. युएस स्टेट डिपार्टमेंटनुसार, या वर्षीच्या पहिल्या 9 महिन्यांत भारतीयांना जारी केलेल्या F1 व्हिसामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 38 टक्के घट झाली आहे. कोविड महामारीनंतर अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून आले आहे. या वर्षी तर यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. या घटीचे कारण काय आहे हे जाणून घेऊया?
प्रमुख कारणे
अनेक दशकांपासून भारतीय विद्यार्थी पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील शिक्षणसंस्थांना प्राधान्य देत आहेत. दरम्यान कोविडनंतर कमी झालेला ओढा हा विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा कालावधी आणि व्हिसाशी संबंधित चिंता या गोष्टी कारणीभूत असल्याचे मानले जाते. तसेच आता अमेरिकेत शिक्षणापेक्षा बहुतेक विद्यार्थी कॅनडा, यूके, न्युझीलंड आणि जर्मनी सारख्या देशांना शिक्षणासाठी प्राध्यान्य देत आहेत. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये झालेली घसरण ही केवळ भारतीय विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही. तर भारताव्यतिरिक्त इतर देशांतील विद्यार्थ्यांमध्येही घट झाली आहे.
भारतीय विद्यार्थी आणि अमेरिकन व्हिसा ( 2020 ते 2024 )
अहवालानुसार, 2024 च्या जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान 64,008 भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी करण्यात आले होते, तर 2023 मध्ये याच कालावधीत ही संख्या तब्बल 1,03,495 होती. त्याअगोदर म्हणजे 2022 मध्ये ही संख्या 93,181 इतकी होती. 2021 मध्ये याच कालावधीत 65,235 भारतीयांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात, 2020 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत भारतीयांना फक्त 6,646 F-1 व्हिसा जारी करण्यात आले होते. 2021 ते 23 या तीन वर्षाच्या तुलनेत भारतीयांची यावर्षी झालेली घट आकडेवारीनुसार दिसून येते. कोविडनंतर ही घसरण नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.
चीनच्या विद्यार्थ्यांमध्येही घट
अमेरिकेमध्ये भारतासहित चीनचे विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी प्राधान्य देत असत मात्र आता चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 8 टक्के कमी चिनी विद्यार्थी अमेरिकेत पोहोचले. 2023-24 मध्ये, अमेरिकन विद्यापिठांमध्ये मागील वर्षी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख म्हणजे 3,31,000 च्या वर गेली होती जी एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या 29.4 टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्याबाबतीत भारतीय विद्यार्थ्यांनी चीनलाही मागे टाकले होते.
F-1 व्हिसा
F-1 व्हिसा म्हणजे अमेरिकेमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नॉन-इमिग्रंट श्रेणी आहे. तर M-1 व्हिसामध्ये व्यवसाय आणि गैर-शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश असतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या व्हिसाच्या नियमांमध्ये अजून कठोरता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणासंबंधी बदलता कल कायम राहू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.