फोटो सौजन्य - Social Media
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिल्लीत मोठी संधी उपलब्ध झाली असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा जॉब फेअर सोमवार, १२ जानेवारी रोजी दिल्लीत पार पडणार असून, यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आधीच नोंदणी करता येणार आहे. या रोजगार मेळ्यात एव्हिएशन, बीपीओ, कस्टमर सर्व्हिस, सेल्स, टेक्निकल रोल्स, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार असून, उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या आणि पात्रतेनुसार नोकरीसाठी अर्ज करता येईल. हा जॉब फेअर विशेषतः इग्नूचे सध्याचे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळ्यात पदवीधर, पदवीपूर्व, अनुभवी तसेच फ्रेशर्स अशा सर्व प्रकारच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. पदानुसार वेतन वेगवेगळे असणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. रोजगार मेळ्याच्या दिवशी उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा (CV) सोबत दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) तसेच पासपोर्ट साइज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखत प्रक्रिया आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे उपयुक्त ठरणार आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, उमेदवारांना गूगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. इग्नूने यासाठी अधिकृत लिंक सक्रिय केली असून, इच्छुक उमेदवार त्या लिंकवर क्लिक करून गूगल अकाउंटच्या मदतीने साइन इन करू शकतात. त्यानंतर सक्रिय ई-मेल आयडी, नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, लिंग यासह आपण इग्नूचे सध्याचे विद्यार्थी आहात की माजी विद्यार्थी आहात, याची माहिती भरावी लागेल.
जर उमेदवार सध्या इग्नूच्या कोणत्याही अभ्यासक्रमात शिकत असेल, तर त्याने आपला एनरोलमेंट नंबर, संबंधित रीजनल सेंटर, अभ्यासक्रमाचे नाव, तसेच आपण कोणत्या भाषा बोलू व लिहू शकता, याची माहिती फॉर्ममध्ये नमूद करावी. सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट जतन करून ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या रोजगार मेळ्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी न भरता या रोजगार मेळ्यात सहभागी होता येणार आहे. करिअरला नवी दिशा देण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी हा रोजगार मेळा एक उत्तम संधी ठरणार आहे.






