फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pavitra Portal Teacher Recruitment: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे निश्चित निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मध्ये प्राप्त गुण, शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता या साठी ९० गुण असतील तर संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण राहणार असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे. संबंधित मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी दि. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी दोन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले, तर एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली होती.
दरम्यान, दि. १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन प्रकारांतर्गत शाळांच्या जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्टदरम्यान प्राधान्यक्रम मागविण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात एक लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.
यापूर्वी मुलाखतीशिवाय निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील टप्पा-१ च्या नियमित फेरीतील १३ हजार ११९ रिक्त पदांसाठी २७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या चार हजार ३९० पदांसाठी रूपांतरित फेरीची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेत शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील ‘डाउनलोड’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भात तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
| पद प्रकार | मुलाखतीसह रिक्त पदे | शिफारस होत असलेल्या उमेदवारांची संख्या |
|---|---|---|
| पहिली ते पाचवीसाठी | १,६०९ | ४,४७८ |
| इयत्ता सहावी ते आठवीसाठी | ४,५०५ | १०,७९२ |
| इयत्ता नववी ते दहावीसाठी | ४,२१४ | ११,८८४ |
| एकूण | १०,३२८ | २७,१४५ |
Ans: नवीन नियमांनुसार TAIT परीक्षेतील गुण, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसाठी ९० गुण आणि संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण असणार आहेत.
Ans: ही प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Ans: उमेदवार आपल्या तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.






