फोटो सौजन्य - Social Media
कला शाखेत दुसरे वर्ष शिकणारी काजोल ही शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थीनी असून तिच्या या यशामागे प्रशिक्षक मयूर सिहासने आणि डॉ. प्रशांत पाटील यांचे काटेकोर मार्गदर्शन लाभले आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतलं हे तिचं पहिलंच सुवर्ण, आणि त्यामुळे या विजयाची किंमत आणखीनच मोठी ठरते. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि तगडा स्पर्धात्मक माहोल हे सर्व अडथळे पार करत काजोलने दाखवून दिले की जिद्द, शिस्त आणि मेहनत असेल तर मोठं यश दूर नसतं.
काजोलसोबतच सायकलिंगमध्येही महाराष्ट्राची आणखी एक छाप पडली. आहिल्यानगरच्या अपूर्वा गोरे हिने जयपूर येथील महिलांच्या वैयक्तिक टाइम ट्रायल स्पर्धेत कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राचा अभिमान वाढवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी अपूर्वा ही २०२२ मधील खेलो इंडिया युवा स्पर्धेतील रूपेरी विजेती आहे. त्या यशानंतर दोन वर्षांनी पुन्हा पदकाची कमाई करत तिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची नवी नोंद केली आहे. या स्पर्धेत गुरु नानक देव विद्यापीठाच्या मीनाक्षी रोहिलाने सुवर्णपदक मिळवले.
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे हे पाचवे पर्व राजस्थानमधील सात शहरांमध्ये रंगते आहे. देशभरातील २२२ विद्यापीठांचे तब्बल ४,४४८ खेळाडू २३ पदक स्पर्धांमध्ये उतरले असून स्पर्धेचं वातावरण अत्यंत रंगतदार झालं आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी प्रभावी कामगिरी करत विजयी वाटचाल कायम ठेवल्याने संघाचा आत्मविश्वासही अधिक वाढला आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या काजोलने अत्यंत कठीण परिस्थितीतून क्रीडा प्रवास सुरू केला. घरातली आर्थिक ताणतणावाची परिस्थिती, साधनांची कमतरता, शिक्षण आणि सराव यांच्यातील ताळमेळ या सर्व अडचणींवर मात करत तिने सुवर्णपदक मिळवून दाखवले. तिची कथा ही केवळ क्रीडा यशाची नाही, तर हजारो मुलांसाठी प्रेरणा बनणाऱ्या चिकाटीची आणि स्वप्नांच्या पाठलागाची कहाणी आहे. काजोल आणि अपूर्वाच्या चमकदार कामगिरीमुळे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा डंका अधिक जोरात वाजत असून आगामी दिवसांतही अशीच विजयी भरारी पाहायला मिळेल, अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.






