
पुण्यात MPSC पेपरफुटीविरोधात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा. रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
Pune MPSC Student Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात विद्यार्थ्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या आंदोलनाला विरोधकांकडूनही पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने या मोर्चाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला आक्रोश मोर्चा हा सरकारच्या अपयशाचा पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला.
आपल्या अधिकृत ‘x ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत रोहिणी खडसे म्हणाल्या, “MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे! या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे तर काहींच्या वडिलांनी इतकं कर्ज काढले आहे की आयुष्यभर कष्ट केले तरी फेडू शकणार नाही. पेपर फोडणाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे.”
MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे! या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे तर काहींच्या… pic.twitter.com/rElS71grlC — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) September 7, 2026
“माय बाप सरकाराला जनाची नाही मनाची तरी असेल तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात आणि लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा घ्यावा !” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, राज्यभर चर्चेत असलेल्या MPSC परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात नंदुरबार येथून ऋतुजा पाटीलला अटक करण्यात आली आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल 270 पानांच्या WhatsApp चॅट्समुळे तपासाला नवी दिशा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
या प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचा मोबाईल उल्हास नदीत फेकण्यात आल्याचा दावाही तपासादरम्यान समोर आला आहे. त्यामुळे MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा तपास आणखी महत्त्वाचा ठरला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकार आणि MPSC प्रशासनावर दबाव वाढताना दिसत असून, या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.