फोटो सौजन्य- सोशल मीडिया
‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग: आशिया २०२७’ मध्ये भारतातील एकूण ३२५ विद्यापीठांचा समावेश झाला असून, यात ३४ नवीन विद्यापीठांनी प्रवेश केला आहे. यासह भारत हा चीननंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उच्च शिक्षण प्रणाली असलेला देश बनला आहे. क्यूएसच्या माहितीनुसार, या रँकिंगमध्ये २६ उच्च शिक्षण प्रणालींमधील तब्बल १,७२२ विद्यापीठांचा समावेश आहे. मात्र, भारताचे प्रतिनिधित्व वाढले असले तरी, यावेळच्या यादीत भारतातील अव्वल ६ उच्च संस्थांची रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली ही भारतातील सर्वात अव्वल मानांकन असलेली संस्था म्हणून आपले स्थान टिकवून आहे. मात्र, आशियाई स्तरावर ती ५९ व्या स्थानावरून ६६ व्या स्थानावर खाली आली आहे. दुसरीकडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरू ७९ व्या क्रमांकासह भारतीय संस्थांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर IIT बॉम्बे ८३ व्या, तर IIT मद्रास ८५ व्या स्थानावर आहे. IIT खरगपूर ९० व्या आणि IIT कानपूर ९७ व्या स्थानावर फेकले गेले आहे. गेल्या आवृत्तीच्या तुलनेत या सर्व ६ प्रमुख संस्थांच्या रँकिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
याशिवाय, दिल्ली युनिव्हर्सिटी (DU) आशियातील टॉप १०० च्या यादीतून बाहेर पडली असून ती ९५ व्या स्थानावरून १०६ व्या क्रमांकावर खाली आली आहे. दुसरीकडे, चंदीगड युनिव्हर्सिटीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून ती १०९ व्या स्थानावरून १०४ व्या स्थानावर पोहोचली आहे, तर लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) १८७ व्या स्थानावरून १५४ व्या स्थानावर आली आहे.
| इंडियन इन्स्टिट्यूट | आशिया रँकिंग |
|---|---|
| IIT दिल्ली | ६६ |
| IISc बंगळुरू | ७९ |
| IIT बॉम्बे | ८३ |
| IIT मद्रास | ८५ |
| IIT खरगपूर | ९० |
| IIT कानपूर | ९७ |
| चंदीगड युनिव्हर्सिटी | १०४ |
| दिल्ली युनिव्हर्सिटी | १०६ |
| IIT गुवाहाटी | १२० |
| IIT रुडकी | १२४ |
क्यूएस रँकिंगमध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ने सलग दुसऱ्या वर्षी पहिले स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ ‘पेकिंग युनिव्हर्सिटी’ दुसऱ्या स्थानावर आहे. ‘शिंगुआ युनिव्हर्सिटी’ नवव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर आल्यामुळे टॉप ३ मध्ये चीनच्या दोन संस्थांचा समावेश झाला आहे. तसेच ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ आणि ‘द चायनिज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग’ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सिंगापूरची ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’ आणि ‘नान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आल्या आहेत.
या रँकिंगमध्ये भारतीय विद्यापीठांच्या रँकिंग घसरण्यामागे आशियातील वाढती तीव्र स्पर्धा हे मुख्य कारण मानले जात आहे. यंदाच्या रँकिंगमध्ये १९५ नवीन विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. तसेच आधीपासून असलेल्या अनेक विद्यापीठांनी यंदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या रँकिंगमध्ये शैक्षणिक प्रतिष्ठा या निकषावर ७६ टक्के आणि एम्प्लॉयर रेप्युटेशन या निकषावर ८३ टक्के भारतीय विद्यापीठांची कामगिरी कमकुवत झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्टुडंट एक्सचेंजशी संबंधित निकषांवरही भारतीय संस्थांचे नुकसान झाले आहे.
Ans: या रँकिंगमध्ये भारतातील ३२५ विद्यापीठांचा समावेश झाला असून, यंदा ३४ नवीन विद्यापीठांनी या यादीत प्रवेश केला आहे.
Ans: IIT दिल्ली ही आशियात ६६ व्या स्थानासह भारतातील सर्वात अव्वल मानांकन असलेली संस्था ठरली आहे.
Ans: 'युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग' (University of Hong Kong) ने सलग दुसऱ्या वर्षी आशिया खंडात प्रथम क्रमांक पटकावला आहे.






