जलसंधारण विभागातील गट 'ब' च्या 650 पदांसाठी होणार फेरपरीक्षा
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मृदा आणि जलसंधारण विभागातील गट बी संवर्गातील 650 पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. राज्य सरकारकडून याआधी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अमरावती येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्याने, राज्य सरकारने ही परीक्षा रद्द केली असून आता ती नव्याने घेतली जाणार आहे.
कधी होणार फेरपरीक्षा?
राज्य सरकारच्या मृदा आणि जलसंधारण विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे जुलै महिन्यात 14, 15, 16 जुलै रोजी ही फेरपरीक्षा घेतली जाणार असून, ही परीक्षा अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडावी. यासाठी राज्य सरकारकडून विशेष पावले उचलली जात आहे. यासाठी सरकारने ही परीक्षा राज्यातील 7 शहरातील टीसीएस-आयओएन कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने टीसीएसच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपुर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या परीक्षा केंद्रांचा सहभाग असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
अमरावती केंद्रावर झाला होता गैरप्रकार?
राज्य सरकारकडून फेब्रुवारी २०२४ या महिन्यामध्ये जलसंधारण विभागाची गट बी संवर्गातील ६५० पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अमरावती येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेत गैरप्रकार झाला होता. मात्र, आता अमरावती परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारने ही परीक्षाच रद्द केली आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी नव्याने घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.