खेड पंचायत समितीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा; बाबाजी काळेंची रणनीती ठरली यशस्वी
राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच खेड तालुक्यातील पंचायत समितीवर अखेर आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सत्ता स्थापन झाली आहे. सभापती आणि उपसभापती पदाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत आमदार काळे यांच्या रणनीतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
सभापती पदासाठी विद्या सयाजी मोहिते यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीत आमदार बाबाजी काळे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडून आल्यानंतर त्यांच्यावरच सभापतिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपसभापती पदासाठी सामान्य कुटुंबातील तरुण मंगेश गुलाब सावंत यांची निवड करून आमदार काळे यांनी नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक स्तरावर स्वागत होत आहे.
खेड पंचायत समितीच्या सत्तेसाठी यापूर्वी मोठा सत्तासंघर्ष गाजला होता. त्यामुळे कोणतीही राजकीय उलथापालथ होऊ नये यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समितीचे निवडून आलेले सर्व ९ सदस्य काही दिवसांसाठी राजकीय सहलीवर अज्ञा स्थळी पाठवले होते. या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते. तसेच माजी मंत्री सचिन अहिर यांनी देखील या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
हेदेखील वाचा : Sharad Pawar News : राज्यसभेवर हॅटट्रीक! उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट
दरम्यान, खेड पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला असून, ज्ञानेश्वर ढेरंगे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती पदांची निवडणूक पार पडताच खेड पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता अधिकृतपणे स्थापन झाली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले






