माणसाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शाळेतून तुम्हाला प्राथमिक शिक्षण दिले जाते तर महाविद्यालयात तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करु इच्छिता त्या क्षेत्राच्या अभ्यासक्रमाचा निवड करु शकता. अनेकांना शिक्षणात रसही नसतो मात्र अनेकांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येतात त्यामुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागते. त्यातील अगदी काहीच जण नंतरच्या काळात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातील सर्वात मोठे उदाहरण ठरले आहेत 81 वर्षीय सतपाल अरोरा. त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे.
राजस्थान चित्तौडगढ शहरातील प्रतापगड येथे राहणाऱ्या 81 वर्षीय सतपाल अरोरा यांनी हे सिद्ध केले आहे की, शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला असून त्यांचे हे पाऊल सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांनी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. यामुळे महाविद्यालयीन कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव केवळ प्रेरणादायीच नाही तर अद्भुतही आहे.
सतपाल अरोरा यांनी 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये पाऊल ठेवले
सतपाल अरोरा हे महाविद्यालयात नियमितपणे येतात आणि त्यांच्या नातवांच्या वयांच्या विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करतात. त्याच्या या प्रयत्नांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. वर्गात बसून लेक्चरला बसण्याची आणि शिकण्याची त्याची तळमळ कोणत्याही विद्यार्थ्यापेक्षा कमी नाही.सतपाल अरोरा यांनी 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आहे. अरोरा यांनी एमए पूर्ण केल्यानंतर कायद्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवले आहे. आपल्या ओळखीच्या आणि कॉलेजच्या लेक्चररशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लॉ करण्याचा निर्णय घेतला.
एलएलबीनंतर सतपाल यांचे पीएचडी करण्याचे स्वप्न
अरोरा यांचे मत आहे की, वय हा कोणत्याही कामात कधीही अडथळा बनू नये. जगण्यासाठी आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. एलएलबीनंतर पीएचडी करण्याचेही त्याचे स्वप्न आहे.
एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व
आपल्या दोन मुलांसह आनंदी कौटुंबिक जीवन जगणाऱ्या अरोरा यांनी शिक्षणाचा घेतलेला ध्यास निवृत्तीनंतर आपण आता निष्क्रिय होणाऱ्या प्रेरक आहेच शिवाय त्यांचा शैक्षणिक प्रवास हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
शिक्षणासाठी स्वयंप्रेरणेचे महत्व
त्यामुळे शैक्षणिक प्रवास कोणताही व्यक्ती कधीही सुरु करु शकतो हे अशा व्यक्तीमत्वांमुळे कळते. आजच्या काळात तर नवनवीन तंत्रज्ञान बदलत चालले आहे त्यामुळे प्रत्येकालाच ते तंत्रज्ञान अवगत करणे हे नोकरीसाठी व्यवसायासाठी आवश्यक असते. त्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नसतो मात्र एखादा अभ्यासक्रम स्वत:हून शिकण्याची असलेली स्वयंप्रेरणा ही प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची असते. ती स्वयंप्रेरणा त्या व्यक्तीला शिक्षित बनवतेच आणि त्यामुळेच सतपाल अरोरा यांच्यासारखे आदर्श समाजासमोर येतात.






