फोटो सौजन्य - Social Media
बीड जिल्ह्यातील परळी परिसरात दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेबाबत पेपरफुटीची चर्चा समोर आल्याने शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. या प्रकरणी संबंधित परीक्षा केंद्रावर चौकशी सुरू करण्यात आली असून केंद्रप्रमुखासह संबंधितांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी प्रश्नपत्रिका काही शिक्षक आणि पालकांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याची चर्चा पसरली. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने हालचाल करत केंद्र परिसरात चौकशी सुरू केली.
दरम्यान, प्राथमिक चौकशीत शिक्षण अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची ठोस घटना घडल्याचे नाकारले आहे. चुकीच्या अफवा पसरवल्याचा आरोप करत केंद्र संचालक साळवे यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांनी माहिती दिली.
तथापि, या प्रकरणाची सखोल शहानिशा करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पिंपळनेर येथे भरारी पथक पाठवण्यात आले आहे. तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत.
107 परीक्षा केंद्रांना लावण्यात आले कुलूप
राज्यात सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून राज्यातील तब्बल १०७ परीक्षा केंद्रांना कुलूप लावण्यात आले असून त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात येणार नाहीत.
परीक्षेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी राज्यातील सर्व उर्वरित केंद्रांवर CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या पावलामुळे कॉपी रोखण्यास मदत होणार असून परीक्षा प्रक्रिया अधिक कडक आणि विश्वासार्ह होणार आहे.
दरम्यान, सामूहिक कॉपीच्या घटना समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा मोठ्या प्रमाणावर होत असून लाखो विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. प्रशासनाकडून पारदर्शक आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.






