फोटो सौजन्य - Social Media
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना स्वतंत्र गुणपत्रिका (मार्कशीट) आणि प्रमाणपत्र देण्याऐवजी एकच संयुक्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे हाताळणे सोपे होणार असून, विविध ठिकाणी अर्ज करताना होणाऱ्या त्रुटींची शक्यता कमी होईल.
मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, फेब्रुवारी-मार्च २०२६ पासून होणाऱ्या परीक्षांपासून ही नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळांना याबाबत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. शिक्षण व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सुलभता देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या नव्या व्यवस्थेनुसार प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव ठराविक क्रमाने छापले जाणार आहे. यात प्रथम विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी नावांच्या वेगवेगळ्या क्रमामुळे अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. आता या एकसंध पद्धतीमुळे अशा समस्यांपासून विद्यार्थ्यांची मुक्तता होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या फोटोसंदर्भातही मंडळाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी भरलेल्या अर्जावर जर विद्यार्थ्यांचा फोटो अस्पष्ट किंवा चुकीचा असेल, तर तो योग्य फोटो चिकटवून शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक राहील. तसेच, सुधारित फोटोची अचूक नोंद संयुक्त प्रमाणपत्रावर व्हावी यासाठी तो फोटो पुन्हा अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर फोटो दुरुस्तीची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढील काळात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच शैक्षणिक कागदपत्रांमधील एकसंधता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






