फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेची तयारी करतात, पण त्यामधून फारच थोडे यशस्वी होतात. कारण या परीक्षेत केवळ अभ्यास नव्हे, तर धैर्य, संयम आणि योग्य रणनीती यांचीही आवश्यकता असते. अशाच एक प्रेरणादायी यशकथेची नायिका आहे अनुपमा अंजली, जी कोणतीही कोचिंग किंवा क्लास न लावता देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक UPSC उत्तीर्ण झाली आणि IAS अधिकारी बनली.
अनुपमा दिल्लीची रहिवासी असून तिथेच तिचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. पदवी पूर्ण केल्यानंतर तिने UPSC ची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नाही, पण तिने हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता, अधिक ताकदीने तयारी करत दुसऱ्या प्रयत्नात तिने यश मिळवले. अनुपमा यांचा परिवार सिव्हिल सर्व्हिसशी जोडलेला आहे. त्यांचे वडील वरिष्ठ IPS अधिकारी होते आणि त्यांनी 37 वर्षे सेवा केली. तसेच तिचे आजोबाही सरकारी सेवेत होते. त्यामुळे घरातील सिव्हिल सर्व्हिस वातावरण आणि त्या क्षेत्राची ओळख हेच तिच्यासाठी एक प्रेरणा ठरली.
अनुपमा यांचे लग्न IAS अधिकारी हर्षित कुमार यांच्याशी झाले, जे 2020 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचे विवाहसोहळे उत्तर आणि दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीने पार पडले आणि सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या छायाचित्रांनी चांगलाच जोर धरला होता. 2017 च्या UPSC परीक्षेत अनुपमा अंजली हिने 386वी रँक मिळवली आणि ती IAS अधिकारी बनली. तिला आंध्र प्रदेश कॅडर मिळाला आणि तिची पहिली पोस्टिंग गुंटूर जिल्ह्यात जॉइंट कलेक्टर म्हणून झाली.
अनुपमा अंजलीने कोणतीही मोठी कोचिंग संस्था जॉइन न करता स्वतःच्या मेहनतीवर आणि नियोजनावर विश्वास ठेवत हे यश मिळवले. ती म्हणते, “स्वतःवर विश्वास ठेवला आणि दररोज ठराविक वेळ अभ्यास केला, हेच माझ्या यशामागचे रहस्य आहे.” अनुपमा अंजली यांची ही यशोगाथा UPSC परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. घरातील वातावरण, स्वतःचा निर्धार, आणि सातत्य यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे तिच्या प्रवासातून दिसून येते.