फोटो सौजन्य - Social Media
राजस्थानमध्ये जन्मलेल्या आणि रायपूरमध्ये वाढलेल्या नेहा ब्याडवाल यांची कथा ही संघर्ष आणि जिद्दीचं उत्तम उदाहरण आहे. बालपणातच त्यांना योग्य शाळा न मिळाल्याने शिक्षणात अडथळे निर्माण झाले. हिंदी नीट बोलता येत नव्हती, इंग्रजीचं ज्ञान नव्हतं, परिणामी पाचवीत त्या नापास झाल्या. पण या अपयशाने त्यांना खचवलं नाही. उलट हेच त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात ठरलं. मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करायचं, हा निश्चय त्यांनी याच काळात केला.
रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतलं. लोकांशी बोलणं, विचार मांडणं आणि वादविवाद यात त्यांना नेहमीच आनंद मिळायचा. या गुणांमुळे कॉलेजमध्ये त्या वादविवाद स्पर्धांमध्ये चमकल्या आणि आत्मविश्वासाने भरल्या. अखेर त्या कॉलेज टॉपर ठरल्या. त्यांच्या या यशाकडे पाहून वडिलांनी त्यांना UPSC ची तयारी करण्याचा सल्ला दिला. संयुक्त कुटुंबातील वातावरण आणि घरी टीव्ही नसल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला. यामुळे त्यांची तयारी अधिक मजबूत झाली.
तथापि UPSC चा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या दोन प्रयत्नांत त्या प्राथमिक परीक्षेत अपयशी ठरल्या. तिसऱ्या प्रयत्नात मेन्सपर्यंत पोहोचल्या, पण यश हातातून निसटलं. हार न मानता त्यांनी चौथा प्रयत्न केला आणि अखेर UPSC CSE 2023 मध्ये यश संपादन केलं. ऑल इंडिया रँक 569 मिळवत त्यांनी गुजरात कॅडरची निवड केली.
फक्त २५ व्या वर्षी अपयशाला पायरी बनवत आयएएस होणं ही मोठी कामगिरी आहे. नेहा ब्याडवाल यांची कहाणी आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की अपयश हा शेवट नसतो, तर यशाकडे नेणारा मार्ग असतो. मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटीची साथ असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं.