संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी तसेच इंजिनिअरींग व इतर महत्वाच्या शाखा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी पुण्यात सक्रिय असल्याचे दिसते. दरवर्षी प्रवेशाच्या निमित्ताने फसवणूक होते. परंतु, या टोळ्या मात्र समोर येत नसल्याचे दिसते.
दरम्यान, पुन्हा एकदा एका व्यावसायिकाला मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय ४५), सौरभ गुप्ता (वय ४०), विकास गुप्ता (वय २८), रणधीर सिंग (वय ३०), प्रियांका मिश्रा यांच्यासह एकावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, ते मगरपट्टा सिटीत राहायला आहेत. तक्रारदार व्यावसायिकाच्या मुलीला वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचा होता. आरोपी मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहायला आहेत, आरोपींशी व्यावसायिकाची एका व्यक्तीमार्फत ओळख झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली. आरोपींनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ६० लाख रुपये घेतले. त्यांनी रोख व ऑनलाइन स्वरुपात आरोपींना पैसे दिले.
पैसे दिल्यानंतरही प्रवेश मिळाला नाही. आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपीना त्यांनी पैसे परत करण्यास सांगितले. आरोपींनी २० लाख रुपये परत केले. उर्वरित ४० लाख रुपये दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तब्बल 15 लाखांना घातला गंडा
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
गेल्या काही दिवसाखाली मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.